जीए कथांचा मानसशास्त्रीय मागोवा – ३

जीएंच्या कथेतील अनेक माणसे जुन्या एखाद्या घटनेचे ओझे कायम मनावर वागवताना दिसतात. आधुनिक मानसशास्त्रात, विशेषतः मानसोपचारात नैराश्यासारख्या आजारांमध्ये जुन्या घटनांमध्ये या आजाराची काही पाळंमुळं आहेत का हे पाहण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा काही गुन्हेगारांचे बालपण तपासले असता ते अत्यंत हलाखीचे, दुःखाचे गेलेले आढळते. आणी त्यापैकी अनेकांचे लहानपणी शोषण झालेले दिसते. ही झाली अगदी टोकाची उदाहरणं. जीएंच्या कथांमध्ये अगदी टोकाला गेलेली माणसे क्वचितच दिसतात. मात्र घटनांचे ओझे बाळगून त्यामुळे पिचलेले, दबलेले मन घेऊन जगणाऱ्याचे एक वेगळेच जग जीएंच्या कथांमध्ये दिसते.

कधीकधी मला वाटते की टोकाला गेलेली माणसे एका दृष्टीने सुटतात. कारण एका क्षणात ती काहीतरी भयंकर करून बसतात किंवा त्यांच्या हातून काहीतरी भयंकर घडतं. आणि पुढे काहीतरी निकाल लागतो. जीएंच्या कथांमधील माणसे इतकीही सुदैवी नाहीत. जीएंच्याच भाषेत सांगायचं तर ती “विशिष्ट सिच्युएशन” मध्ये अडकलेली आहे. हे जीवघेणे “अडकलेपण” हा जीएंच्या कथेचा प्राण आहे अशी माझी समजूत आहे. या माणसांना सुटका नाही हे पाहून वाचकाला जीएंच्या कथा वाचताना दम लागतो, त्याचा श्वास कोंडतो. घर कथेतील मधूकाका लहानपणी भोगलेल्या हालअपेष्टा आणी अपमानाचा वळ घेऊन मोठे होतात आणि आपले स्वतःचे घर उभारायचे हे स्वप्न घेऊन आयुष्य काढतात. ते करताना आपण सगळ्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध आपल्या इच्छेच्या दावणीला बांधले आहे हे त्यांच्या मनातही येत नाही. घरातल्या कुणालाही त्यांच्या या इच्छेबद्दल आदर नाही. हे शल्य घेऊनच मधूकाका जाणार. त्यांची सुटका नाही
.
“तळपट” मधल्या दानय्याकडून म्हातारपणी दुसऱ्याचा नाग चोरण्याची बुद्धी होते आणि त्याला वस्ती सोडावी लागते. पण ते करण्याआधी स्वतः एक नाग पकडण्याची इर्षा तो बाळगतो आणि पकडतोही. पण ऐनवेळी अनेक वर्षांपूर्वी वस्ती बर्बाद केलेली रुक्मी समोर आहे असा त्याला भास होतो आणि नागावरचा त्याचा हात ढिला पडतो. आयुष्यभर मनात बाळगलेले रुक्मीचे शल्य दानय्याबरोबरच जाणार. त्याला त्यातून सुटका नाही. गिधाड कथेतील एका मोहाचा क्षणी बापु काळुस्कराच्या हातून चोरी घडते. आता तो डाग घेऊनच बापु काळुस्कर जगणार आणि त्या डागाचे दुःख त्याच्याबरोबरच जाणार. त्याचीही त्यातून सुटका नाही.

या झाल्या माणसांच्या हातून घडलेल्या घटना. जीएंच्या कथेत काही माणसे जन्मतःच काही वैगुण्यं घेऊन आलेली असतात. ओठांच्यावर लव असलेली सिस्टर, शेलॉटमधील निबर पायांची काशी, गुंतवळ मधील तोतरा साळवी, कवठेतला फिट येणारा दामु ही माणसे आपापल्या वैगुण्याशी झगडत असताना बघवत नाही. गॉफमन या समाजशास्त्रज्ञाने “स्टीग्मा” या संकल्पनेवर केलेले संशोधन याबाबत विचारात घ्यावेसे वाटते. निरनिराळी वैगुण्यं, न्युनगंड बाळगुन माणसे कशी वावरत असतात यावर हे संशोधन आहे. कारण समाजात ही माणसे “नॉर्मल” या कॅटेगरीत बसत नाहीत. अशावेळी समाज एकतर यांची दया करतो किंवा यांची चेष्टा करतो. बरोबरीने यांना क्वचितच वागवलं जातं. जीएंनी नेमकी ही नस आपल्या कथेमध्ये पकडली आहे असं मला वाटतं.

अतुल ठाकुर