जीए कथांचा मानसशास्त्रीय मागोवा -२ (जीएंच्या जन्मदिनानिमित्त)

जीएंच्या कथांमधली अनेक माणसे ही विशिष्ट सिच्युएशनमध्ये अडकलेली असतात. अशावेळी त्यांची वर्तणूक पाहिली तर मानसशास्त्रातील काही संकल्पना त्यात दिसू लागतात अशी माझी समजूत आहे. त्यादृष्टीने जीएंच्या अनेक कथांचा अभ्यास करता येईल असे मला वाटते. पहिल्या भागात आपण व्यक्तीमत्वाबद्दल पाहिले. या लेखात जीएंचे काही कथानायक लौकिकार्थाने सारे काही असूनही दुःखी होताना दिसतात याचे मानसशास्त्रीय कारण शोधण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जीए काही कथांमध्ये ज्याप्रकारे माणसाच्या दुःखाची चर्चा करतात ते समजून घ्यावे लागेल.

डोक्यावर असलेले ओझे कधीही खाली टाकता येईल हे माहित असले तर ते ओझे वाटत नाही असे जीए अनेकदा ध्वनित करताना दिसतात. मानसशास्त्रातील नैराश्यासारख्या विकारांमध्ये माणसाला येणाऱ्या नैराश्याचे एक महत्वाचे कारण आयुष्यातील दुःख आपल्याला काही केल्या टाळता येणार नाही ही भावना असते असे म्हटले जाते. म्हणूनच मानसोपचारांमध्ये असा त्रास असलेल्या माणसांना समुपदेशक निरनिराळे पर्याय देतात. त्यांची भाषा बदलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना घटनेकडे वेगळ्या दृष्टीकोणातून पाहण्यास शिकवतात. डोक्यावरचे ओझे कधीही टाकता येणार नाही या भावनेतून माणसाला नैराश्य घेरताना दिसते. याबाबतीत जीएंच्या “पुरुष” या मला एका अतिशय गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या कथेचा संदर्भ घ्यावासा वाटतो.

कथेतील प्राध्यापक निकम हे बालपणी फार वाईट दिवस पाहिलेले आणि अपमान सोसलेले व्यक्तीमत्व. पुढे तरुणपणात अनेकजण जसे स्वप्नाळू वागतात तसेच तेही वागले. मात्र अपेक्षाभंग झाल्याने हा माणुस अंतर्बाह्य बदलला. आता ते धूर्त झाले आहेत. “माझ्या झोळीत जे टाकते तेच मी तुम्हाला परत वाढीत बसलो आहे” या अर्थाचे एक वाक्य बहुधा याच कथेत आहे. आता ते जुन्या जखमांचा सूड उगवत आहेत. अपमान केलेली जुनी माणसे राहिलेली नाहीत तरीही ते त्यांच्यासारख्या वागणाऱ्या माणसांना धडा शिकवत असतात. आपल्याला पूर्वी त्रास दिलेली सारी माणसे आपल्या जाळ्यात पकडून खेळवणाऱ्या या माणसाला तरीही शेवटी पूर्ण पराभूत झाल्यासारखे वाटते कारण अगदी त्यांच्यासमोर तरुणपणी त्यांच्याच सारखा वागणारा विश्वनाथ समोर येतो.

हे ओझे मात्र प्राध्यापक निकमांना कधीही फेकता येणर नसते. कुठेही गेले तरी ते जसे पूर्वी बावळटासारखे वागले तसे वागणारी माणसे त्यांना नेहेमीच भेटणार असतात. या भोळ्या, भाबड्या (आणि बावळट) माणसांना पाहिल्यावर निकमांना जुने दिवस आठवणारच असतात आणि ती वेदना त्यांना असह्य वाटते. इतकी की ती संपवायला निळ्या धारेची सुरी हवी असे त्यांना वाटते. जीएंच्या कथेत मानसशास्त्र दिसते ते इथे. मात्र `ते अतिशय गुंतागुंतीच्या भावनिक भावनिक स्वरुपाचे असते. यातून या कथानायकांची सुटका नसते कारण त्यांच्या मनात ही दुःखं खोलवर गेलेली असतात.

आधुनिक मानसशास्त्रात मनावरील ओझे बाजुला करण्याचे अनेक उपाय सांगितलेले आहेत. इस्किलार कथेत जीएंनी केलेलं भाष्य मला या बाबतीत महत्वाचं वाटतं. आपला भूतकाळ विचारायला कथानायक अनेक ठिकाणी जातो तेव्हा त्याला काहीवेळा खुळचट उपाय सांगणारेदेखील भेटतात. “अशा उपायांनी काळजात रुतलेली विषारी मुळी निघत नाही. फार तर ती काढताना काळजाचा केवढा भाग तोडून द्यावा लागेल हेच जाणता येते.” असे एक जीएंचे वाक्य आहे. जीएंचे कथानायक डोक्यावरील ओझे कधीही फेकून देऊन शकत नाहीत. हीच त्यांची नियती म्हणावी का?

अतुल ठाकुर