प्रवासी कथेतील जीएंचा बैरागी

जीएंच्या कथांमधील व्यक्तीरेखा मनात ठाण मांडून बसतात. त्यातील मला नेहेमी अस्वस्थ करणारी एक व्यक्तीरेखा म्हणजे बैरागी. मला हा नेहेमी पाऱ्याप्रमाणे चिमटीतून निसणारा माणुस वाटतो. प्रकाशाचे वस्त्रच अंगावर घेऊन बसलेला या बैराग्याची भेट प्रवाशाशी होते त्यावेळी प्रवासी भूकेने जवळपास अर्धमेला झालेला असतो. त्याला प्रकाश दिसतो म्हणून खायला काहीतरी मिळेल या आशेने जवळ येताच त्याला दिसतो तो चितेचा प्रकाश. बैरागी त्याला खायला देण्यासाठी अगदी तयार आहे. कारण त्याने आताच पिठाचे काही गोळे चितेवर भाजत ठेवले आहेत. आणि ती चिता बैराग्याच्या पत्नीचीच आहे. ते चितेवर ठेवलेले गोळे पाहताच प्रवाशाची भूकच मरून जाते.

यापुढे जो काही संवाद आहे तो बैराग्याच्या आजवरच्या चिंतनाचा परिपाक आहे अशी माझी समजूत आहे. खूप पाहिलेल्या माणसांचा राग लोभ कमी होत असावा का? सर्व तऱ्हेचे अनुभव घेऊन कदाचित बैराग्याला विरक्ती आली असावी. तो म्हणतो माझ्या पत्नीने जिवंत असताना त्या शरीराने अनेकांना अनिर्बंध सौख्य दिलं. आता मेल्यावरही शरीराने हे सुख द्यायला ती हरकत घेणार नाही. जिवंत असताना शरीराने इतरांना सुख दिलं आता मेल्यावर त्याच शरीराने अन्न शिजवलं जात आहे. हे सहजपणे स्वीकारणारा माणुस राग लोभाच्या पलिकडेच गेला असणार. माझ्या मनात अशावेळी येतं की या बैराग्याचे त्याच्या पत्नीशी संबंध कसे असतील?

आपल्या पत्नीचे इतरांशी संबंध आहेत हे त्याला बहुधा माहित असेल. आणि त्याने ते मनोमन स्वीकारलं ही असेल कारण बैराग्यासाठी सर्वच किडे. काही वस्त्रातले. वरवर कसर करीत सुखाने जगणारे. हे भोगवादी किंवा संसारी माणसांसाठी असावं. पण विरक्ती आलेल्यांनाही तो स्वतःसकट किडेच म्हणतो. आत पोखरत जाणारा किडा. म्हणजे सुखाचा आस्वाद घेत भोगवादी जीवन जगणारा आणि त्याचा त्याग करून ऐहिकाच्या पलिकडले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारा हे दोन्ही बैराग्याच्या लेखी सारखेच आहेत का? तसे असले तरी मला या दोन्ही मध्ये फरक वाटतो.

बैरागी आता पलिकडल्या तीरावर पोहोचला आहे. गाव किती दूर आहे याचाच मी जन्मभर शोध घेतला पण अद्याप मला बोध झाला नाही असे तो म्हणत असला तरी त्याला ऐहिकातून गावाचा पत्ता मिळणार नाही याची निश्चित खात्री झाली असे मला वाटते. म्हणूनच निर्विकार मनाने तो आपल्या आजच्या जेवणाची सोय स्वतःच्या पत्नीच्या चितेवरच पिठाचे गोळे भाजून करतो आहे. या उलट प्रवाशाने आपला मार्ग कुंपणाच्या दुसऱ्या बाजूचा आहे हे मान्य केले आहे. त्याला जीवनाविषयी अतीव आसक्ती आहे. आणि तो जीवन संपल्यावर काय होणार याविषयी निर्विकार आहे. फळ खाल्ल्यावर त्याची साल गजराज खातो की स्मशानातील कोल्हा याच्याशी त्याला घेणेदेणे नाही.

त्यांच्या भेटीच्या अगदी सुरुवातीच्या चार दोन संवादाबद्दल मला जे जाणवले ते येथे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. पुढे तर सारे अफाटच आहे. त्यातील एकेका वाक्याबद्दल बरेच काही लिहिता येईल. मला वाटते ही दोन्ही माणसे जीवनपटाच्या दोन टोकाला उभी आहेत. एकाने ऐहिक गोष्टींचा त्याग केला आहे आणि त्याला “गाव किती दूर आहे” याचा शोध घेण्यात रस आहे. तर दुसऱ्याला ऐहिकात आसक्ती आहे आणि गाव किती दूर आहे या प्रश्नात काडीचाही रस नाही. बैराग्याचा प्रवास संपला आहे. त्याने त्याच्यापुरती उत्तरे शोधली आहेत असे मला वाटते. प्रवाशाचा प्रवास कसा संपणार हाच महत्वाचा प्रश्न आहे.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *