स्वामी – जीए कथा एक आकलन – भाग ४

आयुष्याच्या एका टप्प्यावर अध्यात्माकडे वळताना माणसाची काय भूमिका असते? स्वामी कथेच्या संदर्भात यावर बरेच काही बोलता येईल. मात्र सर्वसाधारणपणे दोन भूमिका याबाबत मांडता येतील. एक म्हणजे सारे काही उपभोगून झाले आहे, काही करण्यासारखे शिल्लक राहिलेले नाही आणि आता परमार्थाची ओढ लागलेली आहे. दुसरी भूमिका, जगात अगणित दुःख आहे, त्यामुळे विरक्ती येऊन परमार्थाकडे वळणाऱ्यांची. जीएंच्या स्वामी कथेबद्दल विचार करताना मी रुपकाच्याच दृष्टीने ती पाहात असतो. कथेचा नायक गावातून बाहेर पडला आहे. तेथे त्याला ओळखणारे कुणी नाही. तेथिल माणसांच्या वर्तणूकीची त्याला खंतही वाटली आहे. एका वयात ही भावना माणसात उचंबळून येते का? आपले कुणीही नाही? सर्व असूनही आपल्याला समजून घेणारे कुणी नाही? आणि त्यामुळे कुंपणापलिकडे काय आहे ते जाणून घेण्याची ओढ लागते? नेमक्या या क्षणी त्याला महंत भेटला आहे.

मागे परतण्याची ओढ नाही कारण तेथे जिव्हाळ्याचे कुणीच नाही. पुढे जाण्याची बस निघून गेली म्हणजे ती संधी निघून गेली असेल. कदाचित काही गोष्टी करण्याचे वय राहिले नसेल किंवा आता उमेदही नसेल किंवा शाश्वती नसेल. भविष्याबद्दल शाश्वती कोण देणार? अशा मधल्या अवस्थेत एक पर्याय समोर आला तो म्हणजे महंत. या महंताने मात्र भविष्यातील सुखाची शाश्वती दिली आहे. ही खात्री ऐहिकाबद्दलचीच आहे. महंताने तुला मोक्ष मिळवून देतो, शाश्वत आत्मिक आनंद मिळवून देतो असे म्हटलेले नाही. तुमची स्नानाची, जेवण्याझोपण्याची चांगली सोय आम्ही करु असे त्याने म्हटले आहे. अनेकजण परमार्थाकडे ऐहीक गरजा भागवण्यासाठीदेखील वळताना दिसतात. कथानायकाने महंतावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत जाण्याची ठरवले आहे.

मात्र या ठिकाणी मला इतर अनेक गोष्टींचा विचार करावासा वाटतो. संध्याकाळ होत असताना, एका आडगावच्या बसस्टॉपवर महंत नक्की काय करत होता? मला सावजाच्या मागावर असलेल्या शिकाऱ्याची अशावेळी आठवण होते. सावज येण्याच्या ठिकाणी आधीच शिकाऱ्याने दबा धरून बसावे आणि संधी साधून त्यावर झडप घालावी असे या ठिकाणी झाले आहे काय? महंत त्याला इतर कुठलाही पर्याय देत नाही. त्याला कथानायकाला स्वतःसोबतच न्यायचे आहे. मात्र कसलिही जबरदस्ती करायची नाही. तो स्वतःहून यायला हवा आहे. गाडी गेलीच आहे. मग तुम्ही पुढे काय करणार? परत जाणार? असे उलट महंतच त्याला विचारतो. महंताला समोरचा माणुस काय उत्तर देणार याचा नक्की अंदाज आहे. तो चातुर्याने त्याला आपले म्हणणे मानण्यास भाग पाडत आहे. नायकासमोर आता कसलाही पर्याय नाही हे निश्चित झाल्यावर तो धूर्तपणे आपल्यासोबत मठात येण्याचे त्याला निमंत्रण देतो. पुढे दोन गोष्टी घडल्या आहेत.

एक म्हणजे मठ फारसा दूर नाही हे महंत सांगतो. म्हणजे माणसाला तेथे येण्याचे कष्ट वाटणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे स्नान, जेवण आणि झोपण्याची चांगली व्यवस्था होईल हे देखील तो सांगतो. या दोन गोष्टींमुळे कसलाही पर्याय समोर नसलेला माणुस सोबत येण्यास तयार झाला यात नवल ते काय? प्रत्यक्ष आयुष्यात माणसे निर्णय घेताना समोर असलेल्या निरनिराळ्या पर्यायांचा विचार करतात. येथे कथानायकासमोर कुठलाच पर्याय उपलब्ध नाही. आडगावात आपली कसलिही सोय होईल याची खात्री नसलेला तो विशेष आढेवेढे न घेता महंतासोबत चालू लागतो असे कथेत म्हटले आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर कसलाही पर्याय उपलब्ध नसेल तर मिळेल ते स्वीकारुन माणुस पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. येथेही वेगळे असे काही घडलेले नाही. फक्त महंताने अडचणीत सापडलेल्या माणसाला बरोबर हेरले आहे.

आणखी एका गोष्टीचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. जीएंच्या कथेतील गूढ हे इथे जन्म घेते. मग तिला नियती म्हणा किंवा इतर काही. बसमधून जाताना आपले गाव जवळ आल्यावर नायकाच्या मनात अनावर लहर निर्माण झाली. खरं तर त्याचं तेथे कुणीही नाही. तरीही तो तेथे उतरला. आपण त्या खेड्यात एक दिवस काढणार आहोत हे त्याला कुणी आधी सांगितले असते तर त्याचा विश्वास बसला नसता. अनेकदा आयुष्यात अशा अनाकलनीय घटना घडत असतात. यालाच गूढ म्हणत असावेत का? याचे स्पष्टीकरण कसे करणार? संचित कर्माचा परिपाक म्हणून अशी प्रेरणा होणे आणि त्यामुळे चक्रव्युहात अडकणे हे एक स्पष्टीकरण बाजूला ठेवले तर याबद्दल दुसरे काय म्हणता येईल? जीएंना माणसाच्या या वाटचालीबद्दल प्रचंड आकर्षण होते. सुनिताबाईंना लिहिलेल्या पत्रामध्ये हे अनेकदा जाणवते. एखाद्या नदीचा प्रवास एका विशिष्ट मार्गानेच का होतो या गूढाबद्दल ते अनेकदा बोलतात.

स्वामी कथेतील कथानायकाचा प्रवासदेखील असा अनाकलनीयच व्हायचा होता. म्हणूनच त्याला आता आपले कुणीही नसलेल्या गावात अचानक उतरण्याची बुद्धी झाली. त्याची परतीची बस चुकली. महंत भेटला. आणि त्याला आपल्यासोबत मठात घेऊन गेला. असेच म्हणून आता पुढे जायला हवे…

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *