रमलखुणा पुन्हा पुन्हा वाचताना…

रमलखुणा कितीवेळा वाचले याचा काहीच हिशोब नाही. अशा मोजदाद ठेवण्याची काही गरजही नाही. ते पुस्तक पुन्हा पुन्हा वाचण्याचाच आनंद फार मोठा आहे. मला ते पुस्तक वारंवार वाचण्याची ओढ का वाटते हे पटकन सांगता येणार नाही. वरवरची उत्तरं तयार आहेत. एक तर ते पुस्तक मला सर्वस्वी वेगळ्या वातावरणात घेऊन जाते. दुसरे म्हणजे जीएंच्या भाषेवर जडलेले प्रेम हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचायला उद्युक्त करत राहते. खरंतर जीएंच्या सर्वच कथा अशा आहेत पण रमलखुणा वाचताना मला एखाद्या कलाकाराची आपल्या कलेची आराधना करताना समाधीच लागली असावी असे वाटते. वाक्य तर सोडाच पण एकेक शब्द पारखून, त्यावर प्रक्रिया करून, चोखपणे वेचून येथे ठेवला आहे अशी भावना होत राहते. दोन्ही दीर्घ कथांच्या नायकातील साम्य आणि फरक शोधणे हा एक माझा आवडता छंद झाला आहे.

प्रवासीमधील प्रवासी तर रत्नासाठी प्राचीन देवळातील रुद्रकालीची मुर्ती फोडणारा आहे. एका दुर्मिळ रत्नाच्या आधारे त्याला आयुष्याचा उपभोग हवा आहे. तर इस्किलारमधील नायकाला आपल्या आयुष्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. हा एक ठळक फरक सोडला तर दोघांमध्ये जाणवणारे साम्यदेखील महत्वाचे आहेच. दोघेही स्वतंत्र बाण्याचे, एकटे आयुष्य जगणारे आहेत. दोघांच्याही आयुष्याचे स्पष्ट असे तत्वज्ञान आहे. ही दोन्ही माणसे सामान्य नाहीत. प्रवाशाला आयुष्याचा उपभोग हवा आहे. त्याचा विरक्तीवर विश्वास नाही. या उपभोगासाठी हवी ती किंमत देण्याचीदेखील त्याची तयारी आहे. इस्किलारच्या नायकाला आपला साप कोणता हे जाणून घ्यायचं आहे. कोणत्या भयंकर पातकासाठी आपली निवड झाली आहे या प्रश्नाचे उत्तर त्याला हवे आहे त्यासाठी हवी ती किंमत देण्याची त्याची तयारी आहे.

दोघेही आपापले ध्येय साध्य करताना त्यांचा प्रवास सुरु आहे आणि त्यांना त्या प्रवासात विशिष्ट प्रकारची माणसे भेटली आहेत. जीएंना व्यक्तीच्या जीवन प्रवासाबद्दल अतीव आकर्षण होते. नुसत्या व्यक्तींच्याच नव्हे तर नद्यांचा प्रवास देखील त्या विशिष्ट वाटेनेच का होतो याचे त्यांना गूढ वाटत राहिले. या गूढाचा त्यांच्या लेखनावर नेहेमी प्रभाव पडलेला दिसतो. रमलखुणामध्ये माझ्या मते हा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला आहे. प्रवासी कथेतील प्रवाशाला प्रथम बैरागी भेटतो. तो सारे उपभोग घेऊन विरक्त झालेला माणुस आहे. त्याचासुद्धा पूर्वायुष्यातील एकेक कात बाजूला करत प्रवासच सुरु आहे. आता तो पत्नीच्या चितेवर पिठाचे गोळे भाजून खाऊ शकतो इतकी विरक्ती त्याने साधली आहे. याउलट इस्किलारच्या नायकाला भेटलेला गारुडी आहे.

हा गारुडी अगदी सामान्य आहे. धोकादायक नसलेले साप खेळवायचे, त्यासोबत विदुषकी चाळे करायचे, काहीवेळा लोकांना मुर्ख बनवून पैसे मिळवायचे आणि दिवस ढकलायचे असे त्याचे आयुष्य चालले आहे. मात्र तो आनंदी आहे. त्याला याच आयुष्याचे आकर्षण आहे. आपल्या मर्यादा तो पुरेपूर ओळखून आहे आणि त्या मर्यादांच्या आत राहून तो जगत आहे. तरीही त्याचेही स्वतःचे असे एक तत्वज्ञान आहे. आणि म्हणून तो सामान्य असूनही एका अर्थी सामान्य नाही. तो नायकाशी संवाद साधू शकतो. भयंकराला समोरासमोर पाहण्याचा नायकाचा उद्देश तो समजू शकतो. अशी अनेक माणसे या दोन्ही कथांमध्ये आपल्याला भेटतात जी कथानायकांसोबतच वाचकांचा प्रवासदेखील समृद्ध करीत राहतात. एका अर्थी या माणसांच्या निमित्ताने जीए जगात वावरताना सर्वसामान्यपणे माणसे जे तत्वज्ञान घेऊन वावरतात त्यावरच भाष्य करीत आहेत हे जाणवते.

इस्किलारमध्ये शस्त्रं बनवणारा आणि आजदेखील तलवार गाजवण्याची इच्छा बाळगणारा महत्वाकांक्षी माणुस आपल्याला भेटतो. गुलामांचे तांडे नेऊन त्यांचा व्यापार करणारा व्यापारी येथे आहे. त्याला पैशांपेक्षा हजारो लोकांवर चाललेल्या त्याच्या सत्तेचे आकर्षण आहे. कसलेही काम न करता फक्त उपभोगामध्येच रमलेली माणसे कथानायकाला मद्यागारात भेटतात. त्यांचेही स्वतःचे असे एक तत्वज्ञान आहे. किंबहूना जगत असताना या कथांमधील प्रत्येक जण स्वतःसोबत एका तत्वज्ञानाचा आधार घेऊनच जगत आहे. आपल्यालादेखील एक वाचक म्हणून त्यातील काहींचे तत्वज्ञान पटत असेल, काहींचे पटत नसेल. जीएंना अशी वेगवेगळी मूल्ये घेऊन जगणारी माणसे महत्वाची वाटत असत. जीएं च्या पत्रांमध्ये अशा अनेकांचा उल्लेख आहे.

आयुष्य कदाचित अतिसामान्य असेल पण त्यातही वेगळी मुल्ये घेऊन त्यांचा चिकाटीने पाठपुरावा करीत आयुष्य काढणाऱ्यांबाबत जीएंना आकर्षण होते. त्याचेच प्रतिबिंब या दोन्ही कथांमध्ये पडले आहे असे मला वाटते.

अतुल ठाकुर