गुंतवळ, एका सिच्युएशनमध्ये अडकलेली माणसे

जीएंना माणसांच्या जीवनप्रवासाबद्दल एक प्रकारचे आकर्षण वाटत असे. सुनिताबाईंना लिहिलेल्या पत्रात ते तसा उल्लेखही करतात. त्यात त्यांनी नाईल नदीचे उदाहरण दिले आहे. हजारो मैल प्रवास करून नाईल नदी जेथे विसर्जित होते ती तेथेच का आणि कशी आली असा प्रश्न जीएंना पडतो. आणि आपल्या कथांमध्ये कथेतील पात्रांच्या नेमक्या याच प्रवासाचा मागोवा जीए घेत असतात असे मला वाटते. या संदर्भात मला गुंतवळ या कथेचा विचार करावासा वाटतो. हे करतानाच जीएंच्या कथालेखनाच्या आणखी एका वैशिष्ट्याचा उल्लेख करून पुढे जावे लागेल. जीए विशिष्ट सिच्युएशनमध्ये अडकलेली माणसे आपल्या कथेत रंगवतात. याही बाबतील गुंतवळ ही कथा विचारात घ्यावी लागेल.

जीएंच्या कथेतील “विशिष्ट सिच्युएशन” मध्ये अडकलेली माणसे क्वचितच त्यातून बाहेर पडताना दिसतात. अनेकांची सोडवणूक मृत्युनेच होते. काहींचा हा दमणूक करणारा प्रवास सुरुच राहतो. काहीजण परिस्थितीशी तडजोड करताना दिसतात. पण लख्खपणे झळकत परिस्थितीवर मात करुन बाहेर पडणारी माणसे जीएंच्या कथेत फारशी आढळत नाहीत. याचे एक महत्वाचे कारण त्यांच्या कथेतील पात्रं ही नियतिच्या अटळ प्रभावाखाली वावरत असतात. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी शेवटचा निर्णय नियती घेताना दिसते. गुंतवळमधला जोशी साध्यासुध्या आयुष्याची अपेक्षा बाळगणारा. त्याला शिक्षक व्हायचे होते. पण जास्त पगार मिळेल म्हणून त्याने ही नोकरी पत्करली आहे. त्याच्या स्वभावाशी, त्याच्या आवडीनिवडींशी कशाशीही ही नोकरी जराही जूळत नाही. तेथिल माणसे ही त्याला आपली वाटत नाहीत. किंबहूना त्याला त्यांच्याबद्दल मूक तिरस्कार आहे.

जोशी कधीकाळी तेथून जाईल किंवा तेथेच राहिल याबद्दल काही सांगता येणार नाही कारण पगार जास्त आहे. त्यासाठी त्याने अनेक गोष्टींशी तडजोड केली आहे आणि आपले आयुष्य दुःखी करून घेतले आहे. सुरुवातीला फिरायला वेगळे शर्ट आणि पॅंट वापरणारा जोशी आता निगरगट्टपणे एकच पॅंट पंधरा पंधरा दिवस वापरतो. हा एका सिच्युएशनमध्ये सापडलेला माणुस आहे. हा कायमचा असाच दुःखी आणि अस्वस्थ राहिल का? की याचे आयुष्य पुढे निबर होऊन जाईल? बहुसंख्य जणांच्या रोजच्या आयुष्यात घडणारी ही घटना आहे. आवडीनिवडी बाजूला ठेवून व्यावहारिक दृष्टीने काही निर्णय माणसे घेतात. त्यानंतर व्यावहारिक फायदा झाला तरी परिस्थिती एकदम अंगावर आल्यासारखी होते. आपला निर्णय चुकला हे जाणवते. आता मागे फिरणे शक्य नसते. स्वतःच निर्णय घेतल्यामुळे त्याबद्दल तक्रारही करता येत नाही. आणि शेवटी आपलाच निर्णय कसा बरोबर होता हे स्वतःला आणि इतरांना समजवण्यात आयुष्य खर्ची पडते.

गुंतवळ कथेत अनेक माणसे मुदवाड गावात एकत्र आली आहेत. त्यात जोशीसारखी अजूनही मन संवेदनशील असल्याने त्रास होणारी माणसे आहेत. तर सदुभाऊ सारखी व्यवहारी आणि त्यामुळे दुःखाची टोचणी न जाणवणारी माणसेही आहेत. देशपांडेसारखी त्या भयाण जागी कॅलेंडरवरील बाईच्या चित्रात मन रमवणारी माणसे आहेत तर डिसूझासारखी आता कुठेही घर नसलेली, बांडगुळाचे जीवन जगणारी माणसेही आहेत. सरदारजी एकाच आठवणीवर जगतात आणि त्यांच्या मूक वेदनेचा प्रवास मृत्युनेच संपतो. पांडाचा प्रवास सुरुच झालेला नाही. तो सदुभाऊजवळ अडकला आहे. तोतरा साळवी बहुधा त्याच्या मनातले न सांगताच आपला प्रवास संपवणार. कारण त्याच्या तोतरेपणामुळे कुणी त्याच्याशी फारसे बोलतच नाही. सदुभाऊची बायकोच म्हणता येईल अशा पण बायको नसलेल्या कोकणीचा प्रवास हताशपणाने सुरु आहे. रोज भजी करायची आणि त्याला कुणी हात लावत नाही म्हणून दुःखी व्हायचे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर तेथिल मजूरांचा एका वर्तुळात प्रवास सुरु आहे. त्यांच्या आयुष्यात काही नवे घडत नाही, घडण्याची शक्यताही नाही. उद्या मुदवाडमधील धरणाचे काम संपले की कदाचित ती माणसे दुसऱ्या कुठल्यातरी धरणाच्या कामावर निघून जातील. धरणासारख्या एका मोठ्या गोष्टीला आपला हातभार लागत आहे याचे त्यांना काडीचेही सोयर सुतक नाही. महिनोन महिने चालणाऱ्या या कामाच्या दरम्यान काहींचे आयुष्य तेथे संपत असेल तर काहींचे सुरुही होत असेल. जवळपास बांधलेल्या झोपड्या आणि धरणाची जागा या दरम्यानच त्यांच्या आयुष्यात जी काही हालचाल व्हायची ती होते. बाकी सारे काही जीएंनी म्हटल्याप्रमाणे “एका विशिष्ट सिच्युएशनमध्ये अडकल्यासारखेच…”

अतुल ठाकुर