About

Shallow people demand variety — but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve. – Strindberg (पिंगळावेळ – जी.ए. कुलकर्णी)

मराठी साहित्याचं वाचन पुर्वीपासून असलं तरी एखाद्या लेखकाने कायमचं पछाडल्याचा अनुभव नेहेमी आला नाही. काही प्रथम आवडले. नंतरही वाचन सुरु राहीलं पण वैचारिकदृष्ट्या काही चालना मिळेल असा भाग त्यात कमी होता. जी.एं. नी मात्र सुरवातीपासूनच डोक्याचा ताबा घेतला, वाचल्याक्षणापासून पछाडलं आणि माझं जी.ए. वेड हे उत्तरोत्तर वाढतंच गेलं. आजदेखिल जी.एं चं पुस्तक हातात घेताना वेगळ्याच विश्वाचे दरवाजे आपण उघडतो आहोत हे जाणवतं. वाढत्या वयाबरोबर जी.एं. चं साहित्य हे आयुष्याचे नवनवीन पैलु उलगडत राहतं. अभिजात साहित्याची माझी कल्पना ही सार्वकालिक शाश्वततेची आहे. जी.एं. चं साहित्य हे आजपासून हजार वर्षांनंतर देखिल टवटवीतच राहाणार कारण त्यांनी आपल्या साहित्यात मांडलेले प्रश्न हे सर्व कालात, सर्व मानवी समाजात त्या त्याकाळच्या तत्त्वज्ञांनी हाताळलेले आहेत. नियती, मानव व मानवेतर शक्ती यांतील संबंध, माणसा माणसांतील द्वंद्व, माणुस म्हणुन भोगावं लागणारं दु:ख, मानवी स्वभाव, त्यातील गुंतागुंत, मन, परमेश्वर, समाज या गोष्टींचं गुढ उकलण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. पुढेही चालु राहील. या सर्व प्रश्नांची जास्तीत जास्त निर्दोष उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न माणुस करत आला आहे. जी.एं.नी आपल्या कथांमध्ये हेच केलं. वर दिलेल्या “पिंगळावेळ” या कथासंग्रहावरील अवतरणाप्रमाणेच जी.ए. कायम एकच कथा सांगत राहीले. दुखर्या भागाजवळील शीर आयुष्यभर तोडत राहून जी.एंनी हे भरजरी साहित्य लेणं आमच्यासारख्यांना दिलं. आणि हे दान तरी किती श्रीमंत? दहा पंधरा वर्षापूर्वी वाचलेले जी.ए. वेगळे, आताचे जी.ए. वेगळे. दरवेळी नवी जाणीव, नवा अनुभव, नवा पैलु. जी.एं. चं लिखाण हे महासागराप्रमाणे सारंकाही शांतपणे सामावुन घेऊन पुन्हा भरती आल्याप्रमाणे वरचढ, विस्मयचकीत करणारं. अभिजात साहित्याचं हे दान आम्हाला देताना स्वतः जी.एं.नी आयुष्यात अपार दु:ख सोसलं. जी.एं. चं सारं लेखन त्या वेदनेचा हुंकार आहे. किंबहुना आयुष्यभर सोसलेल्या दु:खाने जी.ए. स्वतःच एक वेदना बनुन गेले होते.

जीएंच्या कथांचे आकलन करणे हे शिवधनुष्य मला पेलवणारे नाही याची नम्र जाणीव मला आहे. मात्र निव्वळ हा प्रयत्नच आनंद देणारा आहे म्हणून तो करावासा वाटतो हे देखील खरे. जीएंच्या स्मृतीप्रित्यर्थ माझ्या सारख्याने लावलेली ही एक छोटी पणती असे या लेखनाचे स्वरुप आहे. जीएंच्या वेदनेचा मागोवा घेण्याचा एक जीए भक्त म्हणून मी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.

डॉ. अतुल ठाकुर

संपर्क
dratulthakur1@gmail.com