जीएंच्या कथांमधील समाजशास्त्र

समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कळत नकळत कुठलिही गोष्ट समाजशास्त्राच्या दृष्टीकोणातून पाहण्याची एक सवयच मला जडली आहे. जीए कथाही त्याला अपवाद नाहीच. मात्र जीएंच्या कथांमध्ये क्लासचा प्रभाव जाणवत असला तरी श्रीमंत ते सर्व दुर्गुणीआणि गरीब ते सर्व सद्गुणी असा भेद केलेला दिसत नाही. जीएंना आर्थिक कुचंबणा, त्यातून जगताना अपरिहार्यपणे येणाऱ्या मर्यादा जाणवत होत्या. त्या त्यांच्या अनेक कथांमध्ये जाणवतात. पण जीएंच्या कथा त्याही पलिकडे जाताना दिसतात. जीएंना मानव आणि मानवेतर शक्ती यातील संबंधांमध्ये रस होता असे ते अनेकदा सुनिताबाईंना लिहिलेल्या पत्रांमध्ये सांगताना दिसतात. याचाच अर्थ गरीबीमुळे आलेली दुःखं त्यांच्या काही कथांमध्ये दिसत असली तरी काही सामाजिक सिद्धांताप्रमाणे आर्थिक दरी दूर केली, सर्वांना पुरेसं मिळालं म्हणजे चमत्कार झाल्याप्रमाणे माणसे सुखी होतील असे घडताना जीएंच्या कथेत आढळत नाही.

उलट जीएंच्या कथेत (पारधी) दादासाहेब आहेत. वकील असलेला हा माणुस आर्थिक दृष्ट्या श्रीमंतच आहे. पण त्याला आत सलणारे दुःख आहे. त्याच्या अवतीभवतीच्या माणसांबद्दल मूक तिरस्कार वाटतो. पडदा कथेतील ठकारांचेही तसेच. त्यांच्या भवतालच्या माणसांशी त्यांचे जमत नाही. पुरुष कथेतील प्राध्यापक निकम तर बावळट माणसांवर सूडच उगवत असतात. ही सर्व आर्थिक दृष्ट्या तशी सक्षम माणसे. पण यांना आतल्या आत कुडतरणारी दुःखं आहेत. आणि ती फसवी, खोटी दुःखं नाहीत. अगदी खरोखरची आहेत. ही झाली माणसामाणसांमधल्या संबंधावर आधारीत असलेली दुःखं. त्यापलिकडे जाऊन जीएंची माणसे नियतीचा शोध घेत असतात.

त्यात प्रवासी, इस्लिलारसारख्या प्रदीर्घकथा आणि सांजशकूनमधल्या कथा असतात. येथे कुठल्याही क्लासचा किंवा ऐहिक सुबत्तेचा प्रश्न येत नाही. येथे हे सर्व मागे टाकून माणसे दिसणाऱ्या जगाच्या पल्याडचा शोध घेताना दिसतात. त्यात प्रवासी किंवा इस्किलारसारख्या कथांचे वेगळी वैशिष्ट्ये असलेले नायकच आहेत असे नाही तर ठिपका कथेतील रामय्यादेखील आहे. या सर्वसामान्य म्हणता येईल अशा माणसालाही तो दूरवर दिसणारा ठिपका खुणावत आहे. माझ्या दृष्टीने जीएंच्या कथांमध्ये समाजशास्त्रातील एक संकल्पना वारंवार डोकावते ती म्हणजे “पॉवर”ची. यावर मायकल फूकोने केलेले काम जगप्रसिद्ध आहे. जीएंच्या अनामिकाचा शोध घेणाऱ्या कथामध्येही माणसे एकमेकांवर कुरघोडी करताना दिसतात. त्यात स्वामी कथेतील महंताचे उदाहरण मला ठळक वाटते.

जीएंच्या कथांमध्ये पिचलेली माणसे दिसतात त्याचप्रमाणे त्यांच्या डोक्यावर बसून त्यांचे शोषण करणारी माणसेही दिसतात. जाळ्यात सापडलेले मोठे मासे तेवढ्यaतल्या तेवढ्यात छोट्या माशांना गिळताना आढळतात. अशाच एका कथेत बापु काळुसकराचे पात्र आहे. सर्व बाजूंनी अपमानित होऊन, पराभूत होऊन आलेल्या या माणसाला त्याच्याहून जास्त खचलेला माणुस दिसल्याबरोबर तो आपली नखे त्यात रुतविण्यासाठी धावताना दिसतो. समाजशास्त्रातील “पॉवर”ची संकल्पना वापरून वेगवेगळ्या अंगाने जीएंचा अभ्यास करता येईल का असा विचार माझ्या मनात अनेकदा येत असतो. तूर्तास इतकेच.

अतुल ठाकुर