जीएंच्या कथांमधील सुखान्ताचा शोध

जीएंच्या कथा आणि सुखान्त या गोष्टी परस्परविरोधी आहेत असेच नेहेमी वाटते. जीएंच्या बहुतेक कथांना लैकिकार्थाने सुखान्त नाही. किंबहूना कथा वाचताना कथेतील दुःख वाचकाचेच दुःख होऊन बसते. ते दुःख हळुहळू सघन होत जाते आणि शेवटी त्याचा कडेलोट होऊन वाचकाच्या हाती सून्न राहणे इतकेच राहते हा आपला नेहेमीचा अनुभव. पण तरीही मला या विषयावर विचार करावासा वाटला याचे कारण माणुस सर्वार्थाने, पूर्णपणे, सर्वकाळ दुःखी राहू शकतो का? दुःख जरी असले तरी माणसाचे त्याबद्दल स्वतःचे असे एक तत्वज्ञान असतेच. आणि त्याच्या आधारे तो आपल्या दुःखाची टोचणी कमी करीत असतो. त्या अर्थाने जीएंच्या कथांमधील व्यक्तीरेखा त्यांच्या दुःखाच्या मर्यादेत थोड्यातरी सुखी आहेत का ते पाहण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी दोन कथा माझ्यासमोर आहेत. “पारधी” ही कथा हिरवे रावे या कथासंग्रहातून घेतली आहे तर “हिरवी मखमल गोरा हात” ही कथा निळासावळामधील आहे.

पारधीमधील वकील दादासाहेबांना केस जिंकूनही समाधान मिळत नाही कारण त्यात लढाई झालेलीच नसते. शिवाय आरोपी यल्लूभीमाला फाशी मिळतच नाही. त्यापेक्षाही जास्त रुखरुख दादासाहेबांना याची वाटते की त्यांना एक माणुस म्हणून यल्लुभीमा अजूनही कळलेला नसतो. आपल्या बायकोचे शेजारच्या डॉक्टरसोबत संबंध आहेत, आपला मुलगा कपाटातले पैसे चोरतो हे सारे त्यांना ठाउक असते. पण ते माहित असूनही दादासाहेब ते सारे चालू देतात कारण हेच त्यांचे बळ असते. तुम्ही मला मूर्ख बनवत नाही आहात तर मीच तुम्हाला मूर्ख बनवीत आहे. माझ्या जाळ्यात तुम्ही आहात आणि मी तुम्हाला माकडासारखे नाचवीत आहे हा दादासाहेबांचा सापळा असतो. त्यांना आजूबाजूची माणसे दुबळी वाटत असतात. कथेत एका क्षणी त्यांना ही माणसे जाळ्यातून बाहेर पडल्यासारखी वाटतात आणि दादासाहेब अस्वस्थ होतात. पुन्हा ही माणसे जाळ्यात गवसतात आणि दादासाहेबांमधल्या पारध्याचा आत्मविश्वास परत येतो. याला सुखान्त म्हणता येईल का हा खरा प्रश्न आहे.

ज्या तऱ्हेची माणसे दादासाहेबांना लाभली आहेत आणि दादासाहेबांचे जगण्याचे जे तत्वज्ञान आहे त्यावरून दादासाहेब हे लौकिकार्थाने सुखी आहेत असे वाटत नाही. पण ते आपल्या अटींवर जगत आहेत. इतरांना तुच्छ समजून पण त्यांना तसे जाणवू न देता. एक तऱ्हेने त्यांच्यासाठी ही त्यांच्या जाळ्यात सापडलेली गरीब जनावरे आहेत. ही समजूत दादासाहेबांना सुख देत असेल का? दादासाहेबांना सुखी समजता येईल का? परीस्थितीशी तडजोड करून जगणारी माणसे सुखी असतील किंवा नसतीलही. पण दादासाहेब परिस्थितीला धूर्तपणे हाताळून तिला आपल्या ताब्यात ठेवून जगत आहेत. ते त्यांचे गुप्त रहस्य आहे. सर्वांना वाटते आहे की ते मला फसवत आहेत पण त्यांना कळत नाही की मीच त्यांना नाचवत आहे. ही भावना दादासाहेबांना सुख देत असेल का हा खरा प्रश्न आहे.

दुसरी कथा हिरवी मखमल गोरा हात. त्यातील दामू नोकरी करण्यासाठी गावातून शहरात येतो आणि काही दिवसातच त्याचा शहराबद्दलचा सारा भ्रम नाहीसा होतो. त्याच्या वाटेला येते ते शहरातील सारे बकालपण. पुन्हा गावी जाताना बहिणीला काही घेण्यासाठी तो बाहेर पडतो आणि नेमका जुगाराच्या जाळ्यात अडकून पैसे गमवून बसतो. मात्र त्या क्षणी त्याच्याकदे हिरवा मखमली ब्लाऊज घातलेली तरुणी वळून पाहते आणि तो क्षण दामू खऱ्या अर्थाने जगतो. शहरात दोन महिने बकाल अवस्थेत काढलेल्या दामूसाठी हा एखच क्षण खरा ठरतो आणि त्याची धूंदी चढून तो सिगारेटचा लांब झूरका घेऊ लागतो. हा दामू सुखी आहे का? हा प्रश्नही विचार करण्याजोगाच.

कायम दुर्लक्षित राहिलेल्या माणसांचे मानसशास्त्र जीए उलगडून दाखवीत आहेत. जगाच्या दृष्टीने ही माणसे जणू अस्तित्वातच नाहीत. त्यांच्या असण्या नसण्याने फार तर त्यांच्या जवळच्यांना फरक पडेल पण इतरांना त्याचे काहीही घेणेदेणे नाही. दामूला तर एकमेव त्याची बहिणच आहे आणि ती ही गावी आहे. इथे त्याचे कुणीही नाही. या शहराने जणू तो पारदर्शक असल्याप्रमाणेच त्याच्याकडे पाहिले. या शहराने त्याच्याबद्दल चांगल्या वाईट कसल्याही भावना कधीही दाखवल्या नाहीत. अगदी शेवटच्या दिवशी जूगारात हरून, मूर्ख बनून दामूने एकच क्षण हस्तगत केला आणि त्याला विजयी झाल्यासारखे वाटले जेव्हा त्या हिरवा मखमली ब्लाऊझ आणि गोरापान हात असलेल्या तरुणीने त्याच्याकदे वळून पाहिले. ती हसलीदेखील.

या एका क्षणामुळे दामू शहराने दिलेल्या साऱ्या व्यथा विसरला. जीएंच्या कथा वाचताना दम लागतो तो याचमुळे. “लई नाही मागणे” हे जीएंच्या एका कथेचे नाव आहे. मला खरं तर ते एका कथेचे नाव वाटत नसून जीएंच्या बहुतेक पात्राची ती शोकांतिकाच आहे असे वाटते. जीएंच्या कथेतील माणसांचेही मागणे लई कधीच नसते. पण ते ही त्यांना कधीच मिळत नाही. मग अगदी उन्हातान्हात आयुष्यभर वणवण झाल्यावर एखादाच क्षण असा येतो की त्यानेही यांचे मन हिरवे झाल्यासारखे फुलून येते. कथेतील दामू किंवा वकील दादासाहेब यांना त्यात समाधान वाटले असेल का हा मला पडलेला प्रश्न आहे.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *