जीएंच्या कथांचा अध्यात्मिक मागोवा…

जीएंच्या कथा हा नियमित वाचण्याचा, त्यातील आनंद घेण्याचा आणि काही अंशी माझ्या अभ्यासाचा विषय आहे.
अनेकदा मनात येतं की शेवटच्या काळात जीएंच्या कथेने जे वळण घेतले होते त्याचा मागोवा घेण्यासाठी एक
लेखमाला लिहावी. जीएंच्या कथा पुढे सूत्रमय होऊ लागल्या होत्या असे मानण्यास वाव आहे.  मात्र या सूत्राचा अर्थ संस्कृत वाङमयातील सूत्र असा करून चालणार नाही. कारण त्यात अल्पाक्षरी असण्याचे महत्त्व फार असते. येथे सूत्राचा अर्थ जीए वाचकाला एक चौकट देतात. त्यातील नायक वाचक स्वतः असु शकतो. हा त्या वाचकाचादेखील प्रवास असु शकतो. त्या कथेत घडलेल्या घटना आपल्या आयुष्यात घडालेल्या घटनांशी पडताळून पाहता येतात. त्यामुळेच असेल कदाचित पण रमलखुणातील जीएंच्या नायकाला नाव नाही. सांजशकूनमधील कथाही त्याच धर्तीच्या. मात्र सांजशकून आणि रमलखुणामध्ये जीएंच्या कथेने घेतलेले वळण स्पष्ट झाले आहे.

असे असले तरी अगदी सुरुवातीपासून जीएंच्या कथांमध्ये या वळणाची बीजं आढळतात अशी माझी समजूत आहे. त्यादृष्टीने स्वामी ही कथा पाहण्याजोगी आहे. मात्र या सार्‍या कथांमध्ये जीएंचा तत्त्वज्ञानाचा प्रचंड अभ्यास जाणवतो. मला “अध्यात्मिक” या शब्दाचा वापर करताना बराच विचार करावा लागला. कारण त्याला अनेक अर्थ चिकटले आहेत. मात्र निव्वळ तत्त्वज्ञान हा शब्द वापरावा असे मात्र वाटले नाही. जीए स्वतः नास्तिक असले तरी ज्याला “स्पिरिच्युअल” म्हणता येईल अशा तर्‍हेचा बाज त्यांच्या कथांचा होता आणि माणसा माणसातील संबंधांपेक्षा माणुस आणि मानवेतर शक्ती यांच्यातील संबंधांमध्ये त्यांना जास्त रस होता असे त्यांनी स्वतः एके ठिकाणी लिहिले आहे. अशावेळी जीएंच्या कथेचा अध्यात्मिक मागोवा घेताना माझ्यासमोर भारतीय तत्त्वज्ञानाची परंपरा समोर आहे. त्यातील शांकर तत्त्वज्ञान, माया, ब्रह्म यांचा उहापोह काही ठिकाणी जीएंच्या कथेत आढळतो. हर्मन हेस या लेखकाच्या कथांचा अनुवाद करताना “माया” या कथेत तर जीए रमून गेलेले दिसतात.

नियती आणि मानव या संघर्षात माणसाला खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य आहे की तो नियतीच्या हातातील बाहुली आहे या प्रश्नाचा जीएंनी प्रामुख्याने विचार केला आहे. जीएंच्या कथांचा अध्यात्मिक दृष्टीने विचार करताना मला नेमक्या याच प्रश्नाची या कथांच्या संदर्भात चर्चा कराविशी वाटते.

अतुल ठाकुर

One thought on “जीएंच्या कथांचा अध्यात्मिक मागोवा…”

  1. जी ए ज्या काळात होते त्या काळात अध्यात्म म्हणजे स्तोत्र पूजा पाठ अवडंबर कर्मठपणा याचे स्तोम माजलेले होते. आजही सगळे थोड्याफार प्रमाणात तसेच आहे. वास्तविक भगवद्गीतेत देवाचे फक्त स्मरण सतत करत राहणे एवढेच अपेक्षित आहे. सहाव्या अध्यायात तर प्रत्येक व्यक्तीत देव हा तत्वरुपात विराजमान आहे म्हणजेच सगळे तो देवच करत घडवुन आणीत असतो आणि आपण समजतो की मी केले. इथे जी ए यांनी त्या देवाला नियती हे नाव मोठ्या खुबीने दिलेले असावे. कारण देव म्हंटले की भावना दुखावणे तसेच त्यांच्या प्रतिभेला मर्यादा येणार वगैरे वगैरे अनेक गोष्टी आल्या असत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *