स्वामी – जी. ए. कथा, एक आकलन – भाग – १

जीएं.नी आपल्या पत्रात एका ठिकाणी लिहिलं होतं कि कथेचा विकास होत असतो. आधी ज्याप्रमाणे गणितात रामकडे पाच आंबे आहेत आणि शामकडे सात आंबे असतील तर त्यांची बेरीज किती अशी सुरुवात होते. पुढे नावे व वस्तू जाऊन अ अधिक ब बरोबर क अशा स्वरुपाची सूत्रे येतात. जीएंना कथेची ही वाढ महत्वाची वाटत होती. त्यामुळे कथेचे शारीर स्वरुप नाहीसे होऊन पुढे फक्त चिन्हे अस्तीत्वात येतात. आणि मग कथेचे, त्यातील अंतर्प्रवाहांचे स्वरुप हे देश काल यांना ओलांडुन पलिकडे निघुन जाते. जीएंच्या कथेने घेतलेले हे वळण पुढे सांजशकुन आणि रमलखुणा यामध्ये स्पष्टपणे दिसुन येते. हे दोन्ही कथासंग्रह १९७५ सालचे आहेत. मात्र त्या अगोदर दीपावलीच्या १९७३ सालच्या अंकात जीएंची “स्वामी” कथा प्रकाशित झाली आहे. ही कथा वाचताना हे लक्षात येते कि जीएंची कथा हळुहळु सूत्रमयतेच्या दिशेने वाटचाल करु लागली होती.

तंत्रसाहित्यातील यंत्राचा उल्लेखसुद्धा जीएंनी कुठेतरी केलेला आठवतो तो बहुधा याच संदर्भात. मूर्ती नव्हे तर यंत्र. पुढे जीए वाचकांना एक चौकट देतात. त्या चौकटीत वाचकाला आपले सारे आयुष्य आणि त्याची बेरीज वजाबाकी दिसते. अ आणि ब च्या जागी काहीही भरु शकता. सूत्र तयार करुन दिले आहे. जीएंच्या पुढच्या कथांचा प्रवास हा मला अशा तर्‍हेचा वाटतो. एखाद्या योग्याने आयुष्यभर एकांतात राहुन साधना करावी आणि केलेल्या साधनेने, चिंतनाचे सार सूत्रबद्ध करुन समाजाला द्यावे तसे जीएंच्या शेवटच्या कथांमध्ये घडले. मात्र तरीही सूत्रबद्ध लेखनामध्ये आणि जीएंच्या कथांमध्ये थोडा फरक मला करावासा वाटतो. सांजशकुनमधल्या कथा या सूत्रांच्या जास्त जवळच्या वाटतात. स्वामीसारख्या कथा जरी सूत्रस्वरुपाच्या वाटल्या तरी त्या दीर्घकथा आहेत. त्यामुळे प्रत्येक ओळ ही आशयघन आहे. कमीतकमी शब्दात जास्तीतजास्त आशय सांगणे हेच तर सूत्राचे काम. आणि जीएंनी या कथेच्या वाक्यावाक्यांमध्ये इतका आशय भरुन ठेवला आहे कि ही कथा कुणासमोर कुठल्या स्वरुपात उभी राहील ते सांगता येत नाही. स्वामी या कथेचे मला जाणवणारे

एक वैशिष्ट्य म्हणजे या कथेत कथानक म्हटले तर फारच लहान आहे. एका आडवळणी गावात आलेला माणुस, आपले जन्मगाव पाहण्याच्या ओढीने त्याला येथवर आणले. परताना वेळ निघून जातो आणि बस चुकते. त्याच वेळी त्याला तेथे एक महंत भेटतो. ही कथेची सुरुवात. हा महंत त्याला एक दिवस राहण्यासाठी म्हणून आपल्या मठात घेऊन जातो आणि तेथे त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळते हा या कथेचा शेवट. या दोन बिंदुंमधली सारी आंदोलने जीएंनी आपल्या चित्रमय वैशिष्ट्यपूर्णे शैलीच चित्रित केली आहेत. आपले गाव म्हणून ओढीने आलेला माणसाला आता तेथे ओळखणारे कुणीच उरलेले नसते. त्याच्या जुन्या घरात देखील अनोळखी माणसे असतात. त्या गावातून बाहेर पडल्यावर तर त्या माणसाचा प्रवास अगदीच अनोळखी प्रांतात होणार असतो. लहानपणाची जागा पाहण्याच्या ओढीने प्रवासातून मध्येच उतरलेल्या माणसाला तेथे काहीच सापडत नाही. आणि परतताना कसलिच आशा नसलेल्या त्याला राहायला जागा, खायला चांगले अन्न आणि पांघरायला उंची कपडे मिळतील अशी आशा दाखवली जाते. भगवे वस्त्र घातलेल्या त्या माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवून तो त्याच्या मगोमाग जातो. आणि ते वचन पूर्णही केले जाते. त्याला स्नानासाठी उंची सुवासिक द्रव्ये उपलब्ध असतात, पांघरायला रेशमी वस्त्र दिले जाते. दुध आणि फळे यांनी त्याचे आतिथ्य केले जाते. हे सारं वाचताना एक वाचक म्हणून जीए नक्की काय करताहेत याचं आकलन करण्याचा प्रयत्न केला असता मला हे जाणवलं की या कथेचा अनेक अंगांनी अर्थ लावला जाऊ शकतो. सर्वप्रथम मला असं वाटतं की ही एक विशिष्ट प्रवृत्ती असलेल्या माणसाची कथा आहे.

आयुष्यात सारे भोग भोगलेले आहेत. कुटुंबाच्या, स्वतःच्या सार्‍या इच्छा, आकांक्षा पूर्ण करताना आयुष्य कधी मावळतीकडे आले कळलेच नाही. मनाला अजुनही समाधान नाही. आता वेळ मो़कळा मिळालेला आहे तेव्हा तळाशी बसलेल्या सार्‍या वासना वर ढवळून आलेल्या आहेत. आता स्वतःला वेळ द्यावासा वाटतो आहे. त्या वासना पूर्ण करायच्या आहेत. त्यातलीच एक म्हणजे तेव्हा कराव्याशा वाटणार्‍या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे. त्यातूनतरी काही समाधान मिळेल का ते पाहण्याचा प्रयत्न करणे. त्या अनावर ओढीने तो आपली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यात यश मिळत नाही. कारण आता तो ही पूर्वीचा “तो” राहिलेला नसतो आणि ते वातावरणही पूर्वीचे नसते. मला वाटते हा अनुभव अनेकांना येत असतो. एखादा मनावर कोरला गेलेला अनुभव पुन्हा त्याच तीव्रतेने मिळेल असे क्वचितच घडते. दुर्दैवाने त्याबाबतीत अतृप्तीच नशीबी येते. हे जागांच्या बाबतीत घडते तर सतत बदलणार्‍या माणासांबद्दल काय बोलणार? कथेत मात्र हे दोन्हीबाबत घडले आहे. त्यामुळे कथानायकाची अतृप्त भावना अधोरेखित झाली आहे. पुढे ही अतृप्त भावना घेऊनच तो तेथून निघतो. आणि नेमका तेथे त्याला महंत भेटतो. जीएंनी कथेत आडगावात मठ आणि महंताची योजना ही एक पॅटर्न समोर ठेवून केली आहे अशी माझी समजूत आहे. आयुष्याच्या शेवटाकडे येताना जुन्या गोष्टींमध्ये न मिळणारे समाधान फक्त अध्यात्मातच मिळेल असे माणसाला वाटत असावे. मात्र आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करतानादेखील त्याचे फलित जे आहे ते ऐहिकच आहे. कथानायकाला राहायला चांगला आसरा मिळणार आहे. खायला नेहेमीपेक्षा चांगले अन्न मिळणार आहे. पांघरायला त्याच्या नेहेमीच्या वस्त्रांपेक्षा चांगली वस्त्रे मिळणार आहेत. म्हणजेच जे आता स्वतःकडे आहे त्यापेक्षा जास्त काहीतरी चांगले होईल, चांगले मिळेल ही अध्यात्माकडे जाण्याची सुरुवातीची प्रेरणा आहे. आणि हे अध्यात्मही कठोर नसून अगत्यशील आहे. महंत अतिशय नम्रपणे वागतो. आणि कथानायकाला आपल्याबरोबर आपल्या मठात घेऊन जातो.

कथेच्या सुरुवातीचा हा प्रवास पाहिला तर हे जाणवतं की जीएंना ज्या सुत्रमय लेखनाची अपेक्षा होती त्याच्या पाऊलखुणा दिसायला सुरुवात झालेली आहे. कथानायकाला नाव नाही, गावाचे नावगाव नाही, कथानायकाची पार्श्वभूमिदेखील फारशी दिलेली नाही. महंत आहे पण भगवेपणाव्यतिरिक्त इतर कसलिही खुण नाही. नायक हा सर्वसामान्य असून आपल्यातलाच आहे. त्याचे जन्मगावही सर्वसाधारण आहे. त्याला जुन्याची ओढ आहे. पण तेथे वळल्यावर त्याचा अपेक्षाभंगही झालेला आहे. शेवटी त्यालाही ऐहिक गोष्टीच्या ओढीनेच अध्यात्माचा आसरा घ्यावासा वाटतो. आणि भगवे घातलेल्याच्या शब्दावर विश्वास ठेवून तो त्याच्याबरोबर निघतो. यातील बहुतेक गोष्टी सर्वसामान्यपणे आपल्या आजुबाजुला घडताना दिसतात. या वाटेवर जाणार्‍यांचे पुढे काय होऊ शकते हे जीएंनी कथेत मांडले आहे. अर्थात हा मी लावलेला अर्थ आहे. जो जीएंना अभिप्रेत नसेलही. पण एक वाचक म्हणून माझा जीएंची कथा आकलन करण्याचा सतत प्रयत्न सुरु असतो. हा प्रयत्न करताना “स्वामी” कथेच्या मला जाणवत असलेल्या अनेक अर्थांपैकी तो एक अर्थ आहे हे आधीच नमुद केलेले बरे. जीएंच्या या असामान्य कथेचा मागोवा घेताना त्यातील अनेक अर्थाचे पापुद्रे उघडण्याची इच्छा आहे. सध्यातरी वर दिसलेली जी चौकट आहे त्या मार्गाने पुढे जाऊन काय अर्थ लागतो याचा विचार पुढच्या भागात करायचा आहे.

(क्रमशः)

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *