जीएंच्या अल्थियाबद्दल…

जीएंची इतर स्त्रीपात्रे आणि अल्थिया यांच्यात मला एक अतिशय महत्त्वाचा फरक जाणवला. आणि तो म्हणजे जीएंची बहुतेक स्त्री पात्रे ही प्रथम पुरुषांच्या हातातील बाहुले असतात आणि मग नियतीच्या. जीएंची बहुतेक सर्वच पात्रे ही नियतीच्या हातातील खेळणी असतातच. पण अल्थिया मात्र या सर्वांहून अगदी वेगळी. तिने तिची चोख वाट निवडली आहे. तिची मंदिरातील मैत्रीण एली प्रमाणे विटंबना झाल्यावर ती भ्रमिष्ट झालेली नाही. तर तिने आपल्या सौंदर्याच्या जोरावर पुरुषांना जाळ्यात ओढले आहे. इतकेच नव्हे तर त्या राज्याच्या सम्राटालादेखिल ती खिशात बाळगून आहे. आजवर पुरुषांकडून झालेल्या विटंबनेचा ती हरक्षण बदला घेते आहे. म्हणूनच ती रस्त्यावरच्या कुणाही पुरुषाला खुण करून बोलवू शकते. आपले शुल्लक काम करायला भाग पाडू शकते. आणि त्याचा तिला अभिमानही वाटतो. आपल्या सौंदर्याबद्दल तिला आत्मविश्वास आहे. आपल्या शरीराकडे पाहिल्यावर आपण सांगितलेले काम पुरुष टाळू शकत नाही हे तिला माहित आहे आणि हा उंदरा मांजराचा खेळ खेळण्यात तिला धन्यता वाटते.

अशा तर्‍हेची इतरांशी खेळ खेळणारी पात्रे जीएंच्या कथेत काहीवेळा भेटतात. पुरुषमधील प्राध्यापक निकम हे इतरांशी खेळतच असतात. पारधी कथेतील वकील दादासाहेब हे इतरांशी खेळतच असतात. पण ही सारी पुरुष पात्रे. अल्थिया रंगवून जीएंनी या कथेत वेगळी वाट धरली आहे. अल्थिया पुरुषांचे शोषण करणारी आहे. अर्थात एलीच्या बाबतीतील तिच्या सार्‍याच मागण्या मान्य होत नाहीत. माझ्यासमोर आता पुस्तक नाही. पण मला वाटते राज्य परत देण्यास सम्राट तयार होत नाहीत. ही अल्थियाची मर्यादा आहे. पण तरीही ही स्त्री आपल्यामर्यादेत का होईना सर्व पुरुषांना नाचवते आहे. हे जीएंच्या अल्थियाचे वेगळेपण आहे.

ही कठोर स्त्री रंगवतानाच तिच्या स्त्रीसुलभ भावना उलगडून दाखवणे हा खास जीए टच. अल्थिया कोण हा प्रश्न नायकाने विचारल्यावर ती संतापते. “तुला अल्थिया माहित नाही?” असे ती विचारते. आपल्यासारख्या सौंदर्यवतीला न ओळखणारा या राज्यात कुणी असु शकतो यावर तीचा विश्वासच बसत नाही. दुसरे म्हणजे तिचे अलैकिक सौंदर्य हे तिचे प्रमुख हत्यार असते आणि त्याचा वापर केल्यावर तिला हवे ते भाव नायकाच्या नजरेत दिसतात. एक क्षण वाटते कथानायक तिला बधणार नाही. पण या गहिर्‍या “जहरा” समोर तो सपशेल मान टाकतो. जीएंच्या कथेत पात्रांची सूत्रे नियतीच्या हाती असली तरी जीएंची ही नायिका पुरुषांची सूत्रे आपल्या हाती ठेवून आहे आणि हेच तिचे वेगळेपण आहे असे मला वाटते.

अतुल ठाकुर