गूढात रमलेले जीए (दिवाळी निमित्ताने)

जीएंच्या कथांमध्ये गूढ गोष्टी अनेक असतात हे सर्वांना ठावूक आहेच. मात्र जीएंच्या पत्रांमध्ये जीएंना गूढाबद्दल अतिशय आकर्षण होते जे जाणवते. सुनिताबाईंना लिहिलेल्या पत्रात दोघेही गूढाबद्दल चर्चा करताना दिसतात. सुनिताबाईंनाही असे अनुभव आले असावेत. जीएंनी स्वतःला आलेल्या अनुभवांबद्दल तपशीलाने लिहिले आहे. त्यात अश्वत्थाम्याबद्दलचा अनुभव विलक्षण आहे. जीएंना महाभारतातील या व्यक्तीरेखेबद्दल जवळीकही वाटत होती. गूढ म्हटल्यावर ज्योतिष, रमल, निरनिराळ्या प्रकारे भविष्य कथन करणारे आलेच. त्यांचा उल्लेख रमलखुणांमध्ये आढळतो. त्यासोबतच उल्लेख येतात ते चेटूक, एखादी शक्ती मिळविण्यासाठी केलेल्या तांत्रिक क्रिया, किंवा अतिमानवी सामर्थ्याचे. यांचे उल्लेख फूंका, अंजन, ऑर्फियस यांसारख्या कथांमध्ये आहेत. याचसोबत जीएंचे वाचनही सर्वस्वी वेगळ्या विषयांवरचे होते हे त्यांच्या आवडीवरून दिसून येते.

घोस्ट स्टोरीजच्या आपल्या आवडीबद्दल ते बोलतात. शिवाय त्यांना हेरकथाही आवडत. मुलखावेगळी प्रवासवर्णने त्यांना प्रिय होती. जीएंनी पौर्वात्य आणि पाश्चात्य तत्वज्ञानाचा बारकाईने अभ्यास केला असावा. त्यातल्या निरनिराळ्या पंथांबद्दल त्यांच्या कथांमध्ये काहीनकाही येत राहते. विशेषतः मठ, संन्यासी, बैरागी, त्यांची जीवनपद्धती त्यांच्या काही कथांमध्ये डोकावतात. रुळलेल्या मार्गांपेक्षा सर्वस्वी वेगळा मार्ग चोखाळणारी आणि कदाचित म्हणून जनसामान्यांच्या उपहासाला पात्र झालेल्या माणसांबद्दल त्यांना सहानुभूती वाटत असे. याबरोबरच त्यांच्या अनेक कथांमध्ये एकटे राहणाऱ्या माणसांचा उल्लेख येतो. काही रमलखुणामधील बैराग्याप्रमाणे खरोखरच जीवनमार्ग म्हणून एकटेपणाची निवड केलेले असतात तर काही “पडदा” कथेतील ठकार किंवा “पारधी” कथेतील दादासाहेबांप्रमाणे माणसांमध्ये राहून एकटे पडलेले असतात. अशाही माणसांनी जीएंना आकर्षित केलेले दिसते.

त्यानंतर जाणवते ती जीएंनी आपल्या कथांमध्ये केलेली वातावरणनिर्मीती. त्यातही गूढ भाग आहेच. एखादे गाव, तेही बाहेरील जगापासून तुटलेले असे, त्यात बाहेरून आलेल्याशी सर्वस्वी अनपेक्षितपणे वागणारी माणसे, किंवा त्या गावातील विचित्र वाटणाऱ्या प्रथा, या साऱ्या गोष्टी त्यांच्या कथांमध्ये येतात. प्रत्यक्ष आयुष्यातही जीए जगावेगळ्या माणसांमध्ये रमणारे होते हे त्यांच्या पत्रांवरून जाणावते. धारवाडमधील क्लबमध्ये ही माणसे त्यांना भेटली. वेगळ्या घडाळ्यांनी चालणारी माणसे अशासारखा शब्दप्रयोग त्यांनी या माणसांबद्दल केला आहे. वेगळी जीवनदृष्टी असलेल्या आणि त्यासाठी अट्टाहासाने वेगळे जीवनमार्ग स्वीकारलेल्या व्यक्ती जीएंना जवळच्या वाटत. याचे मला वाटणारे एक कारण म्हणजे जीए स्वतःच तसे होते. निवड म्हणून एकटे, धारवाडसारख्या ठिकाणी राहणारे, गर्दीत न रमणारे, कुठल्याही साहित्यिक चळवळीमध्ये किंवा गप्पांमध्ये न फारसा भाग न घेणारे.

जीएंच्या काही मित्रांचा उल्लेख काही पत्रांमध्ये येतो. त्यात ते त्यांच्या काजी नावाच्या मित्राचा आदराने उल्लेख करतात. आपला सारा पैसा अत्तराच्या शौकात ओतणारा हा काजी अत्तराच्या एकेका छटेबद्दल बोलू लागला की त्याची सुगंधी कविता होऊन जात असे. त्याला भेटल्याशिवाय आपल्याला चैन पडत नसे असे जीए म्हणतात. दुसऱ्या बाजूने एका वृद्धाला खोकल्याची प्रचंड उबळ आल्याने जेवणाचे ताट कसे उलटले हे हसून हसून सांगणाऱ्या मित्राबद्दल ते नापसंती व्यक्त करतात. मात्र तोच मित्र मुद्दाम आडवाटेला जाऊन त्या वृद्धासाठी औषधी वनस्पती आणून देतो याचाही ते आवर्जून उल्लेख करतात. माणसाच्या स्वभावातील या विसंगतीतही जीएंना रस होता.

यानंतर येतात त्या गूढ वाटणाऱ्या घटना. येथे जीएंची नियती डोकावते. या गूढ घटना हा जीएंच्या कथेचा प्राणच म्हणता येईल. त्यात मग अगदी थोडक्यात बस चुकण्यासारख्या साध्या गोष्टीपासून ते अगदी भावाच्या हातून बहिणीचा खून घडण्यासारख्या भयंकर गोष्टीपर्यंतच्या घटनांमध्ये जीएना नियतीने आखलेला एक पॅटर्न दिसतो आणि त्याप्रमाणे बिनचूक घटना त्यांच्या कथांमध्ये घडत जातात. जीएंचे प्रत्यक्ष आयुष्यातही अशा घटनांकडे लक्ष होते. अनेक कलाकारांनी केलेल्या आत्महत्या, ज्याला ज्याची आत्यंतिक गरज आहे नेमकं तेच आयुष्याच्या शेवटी हिरावलं जाणं, ज्याने कुणालाच त्रास दिला नाही अशा व्यक्तीला कष्टदायक मृत्यू येणं या घटनांमध्ये त्यांना गूढ वाटत असे मानण्यास वाव आहे. या साऱ्यांमध्ये एखादा पॅटर्न दिसतो का हे पाहण्याचा माझा प्रयत्न असतो असे ते आपल्या पत्रांमध्ये म्हणतात.

पुढे पुढे जीएंच्या कथेने स्पष्टपणे सांकेतिक स्वरुपाचे वळण घेतले तरीही त्याची बीजं सुरुवातीपासूनच जीएंच्या कथांमध्ये दिसतात अशी माझी समजूत आहे. मात्र हा प्रवास शेवटी जीएंच्याच भाषेत सांगायचे तर सूत्रांच्या रुपात होऊ लागला. कथेतील पात्रांची नावं हा केवळ उपचार ठरली. आणि त्यात वाचकाला स्वतःचे प्रतिबिंब दिसू लागले. या सर्व प्रवासात मला गूढात रमलेले जीए दिसतात. आपण लावलेल्या दिव्याच्या प्रकाशात सर्वचजण वावरत असतात. जीएंना मात्र त्या प्रकाशापलिकडे असलेल्या घनदाट अंधारात रस होता आणि त्या अंधारात होणारी सळसळ जीएंना सातत्याने जाणवत होती असे मला वाटते.

अतुल ठाकुर