गुंतवळ – जीए कथा एक आकलन

अनेकदा गुंतवळ वाचताना कथानक नसलेली ही कथा आहे असं मला वाटत राहतं. म्हटलं तर धरणावर काम करणारे कर्मचारी तेथे घरून कुणाचेतरी पत्र येईल या आशेने तेथिल एका झोपडीवजा हॉटेलात जमतात. आणि त्यातील प्रत्येकाचे वर्तन, त्याचा भूतकाळ आणि ही माणसे प्राप्त परिस्थितीला ज्या तऱ्हेने तोंड देतात ती त्यांची धडपड इतकीच ही कथा आहे. पण जीएंचे वैशिष्ट्य हे की त्यातील अगदी छोट्यातल्या छोट्या व्यक्तीरेखेबद्दलही ते रेखीवपणे लिहून वाचकाला खिळवून ठेवतात. या कथेत एक अख्खा समाजच एक व्यक्तीरेखा म्हणून आपल्यासमोर येताना दिसतो हे या कथेचे आणखी एक वैशिष्ट्य. धरणावर काम करणारे मजूर आला दिवस ढकलतात. त्याच्या आयुष्याला कसलेही मोठे ध्येय नाही. किंबहूना त्यांना आपण एका मोठ्या कामाचे भाग आहोत ही जाणीवही नाही. हा गट संपूर्ण कथेत अधूनमधून येत राहतो आणि एखाद्या व्यक्तीसारखाच कथेत वावरत राहतो.

त्यानंतर येतात त्या जास्त फोकस केलेल्या व्यक्तीरेखा. त्यादेखील सर्वसामान्यच आहेत. पांड्या, डिसोझा, कोकणी, साळवी यांच्या स्वतःच्या कथा आहेत, त्यांची स्वतःची दुःख आहेत. देशपांडेसारखी त्याही परिस्थितीत हावरा आनंद घेणारी माणसे आहेत. अशाही वातावरणात माणसांच्या आदिम वासना मरत नाहीत. इंजिनियरची बायको बाहेर आली की सर्वांच्या मनात चोरट्या इच्छा सळसळतात. त्यातच सदूभाऊ आहे. हा माणुस व्यवहारी असला तरी त्यालाही सोडून गेलेली आपली बायको आणि मुलगी आठवते. तो हा सल झटकून टाकत असेलही पण सल नाहीच असेही नाही. शिवाय या कथेत सरदारजीसारखा जिवंत नसलेला आणि नुसत्याच खिन्न करणाऱ्या आठवणींच्या रुपाने उरलेला माणुस आहे. त्याचीही कथा आहे. आणि शेवटी जोशी आहे. याला कथेचा नायक म्हणता येईल का हा प्रश्नच आहे. पण जीएंच्या अनेक कथांमध्ये जोशीसारखी माणसे वावरत असतात हे नक्की.

पुरुष कथेतील प्राध्यापक निकम, पारधी कथेतील दादासाहेब, पडदा कथेतील प्रिंसिपल ठकार, माणुस नावाचा बेटा मधील दत्तू या माणसांमध्ये आणि गुंतवळमधील जोशी यांच्यात एक समान धागा आहे. ही माणसे आला दिवस ढकलणारी नाहीत. ही माणसे परीस्थितीचा विचार करणारी आहेत. शक्य झाल्यास त्यावर मात करणारी आहेत. कुठल्यातरी तत्वाने जगणारी आहेत. तसे जगायला न मिळाल्यास चिडणारी, अस्वस्थ होणारी आहेत. त्यामुळे त्यांना काही माणसांचा मनापासून तिटकारा वाटताना दिसतो. जोशीची चीडचीड ही तो ज्या परीस्थितीत आहे त्यामुळे तर आहेच पण त्याला आजूबाजूला जमलेल्या घोळक्याबद्दलही चीड आहे असे मला वाटते. कारण मुळात तो वाट्याला येईल ते आयुष्य स्वीकारणारा नाही. त्याला तुळशीला शांतपणे मंजिऱ्या याव्यात तसे आयुष्य हवे होते असे जीए लिहितात. या भगभगीत जागी जास्त पगारासाठी आपण आलो या जाणीवेने त्याची तडफड होते.

गुंतवळ कथेतील माणसे आपले आयुष्य ढकलत आहेत. अगदी जोशीसकट. फक्त जोशीचे दुःख मात्र मनाच्या तळापासून वर आलेले दिसते. इतरांना दुःख असेलही पण त्यांनी आपापल्या तऱ्हेने त्यावर उपाय शोधलेले आहेत. डिसुझा आता इतरांचे पाचकळ मनोरंजन करत असेतरी दिवस काढतो. पांड्या आपल्याला आपला बाप अजूनही इथून न्यायला आला नाहे म्हणून रडतो पण परत सावरतो. सदूभाऊ तर व्यवहारीच आहे. देशपांडे उत्तान बायकांचे कॅलेंडर मगवतो. कोकणीला भजी बनवण्याशिवाय काही येत नाही पण त्यामुळे तिच्या आडदांड आयुष्यात फारसा फरकही पडताना दिसत नाही. कामगाराची आयुष्य रोजच्या मिळणाऱ्या रोजंदारीइतकेच सर्वसामान्य आहे. त्याचा त्यांना खेदही नाही की खंतही नाही. सरदारजींचे दुःख त्यांच्यासोबतच नाहीसे झाले आहे. प्रश्न आहे तो संवेदनशील असलेल्या जोशीचाच. आपल्यातही जे संवेदनशील असतात त्यांनाच परिस्थितीचा जास्त त्रास होत असेल का?

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *