जीएंच्या व्यक्तीचित्रे – अवशेष – गोविंदाचार्य

जीएंच्या काही व्यक्तीरेखा अशा आहेत की समाजात वावरताना एरवी त्यांच्याकडे कुणाचे फारसे लक्ष जाण्याचा संभव कमीच. किंबहूना काही वेळा अगदी दुर्लक्षित असणाऱ्या माणसांवरच जीएंनी आपल्या कथांमध्ये भिंग धरले आहे आणि आपण दुसऱ्यांदा वळूनही पाहणार नाही अशा माणसांबद्दल विचार करायला लावले आहे. निळासावळातल्या अवशेष कथेतील गोविंदाचार्य ही अशीच एक व्यक्तीरेखा. इतर सर्वसामान्यांसारख्याच इच्छा, आकांक्षा असलेल्या या माणसाच्या आयुष्यात इतरांना जे सहजपणे मिळू शकेल ते देखील मिळत नाही. गोविंदाचार्याची अपेक्षा काय असते? तर कुणीतरी त्याच्याशी चार शब्द प्रेमाने बोलावे. त्यासाठी तो स्वतःहून प्रयत्नही करतो पण त्याचा काही उपयोग होत नाही.

सर्वांनाच त्या अपंग माणसाबद्दल शिसारी वाटते. मोठी माणसे तर दुर्लक्ष करतातच पण मुलेही त्याच्यापासून दूर पळतात. त्याचे एकंदर व्यक्तीमत्वच कुणी त्याच्याजवळ आवर्जून जावे असे नाही. जीएंच्या कथेतील मला हा महत्वाचा घटक वाटतो. त्यांच्या कथेत एखादा माणुस जन्माला येतानाच सोबत असे काही घेऊन येतो ज्यामुळे त्याच्या आयुष्यावर एक गिधाडछाया पडून जाते. दुर्दैव म्हणजे त्यावर त्या व्यक्तीला काही उपायही करता येत नाही. एखाद्याचे हे दुर्दैव गोविंदाचार्याप्रमाणे शारिरीक असू शकेल. हा कुरुप आणि पायाने अधू आहे. काहींच्या बाबतीत हे दुर्दैव हाताला असलेल्या अपयशाच्या रुपाने आयुष्यभर सोबत करीत राहते. जीएंच्या काही व्यक्तीरेखा हात लावला की माती होते असे प्राक्तन घेऊन जन्माला येतात. गोविंदाचार्याच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी घडल्या आहेत.

तो कुरुपही आहे आणि त्याचे नशीबही तितकेच कुरुप आहे. त्याने आयुष्यात सुख मिळविण्यासाठी केलेली कुठलीही गोष्ट यशस्वी झालेली नाही. किंबहूना सुखाने त्याला सातत्याने हुलकावणीच दिलेली आहे. संसार थाटला तर पदरात मूल टाकून बायको पळून गेली. मुलाचा लळा लागला तर तोही जगला नाही. आयुष्यात कमीतकमी अपेक्षा ठेवून जगणाऱ्या आणि तेवढ्या अपेक्षाही धड पूर्ण न होणाऱ्या गोविंदाचार्यांसारख्या व्यक्तींच्या बाबतीत दुर्दैवाचा आणखी एक पदर दिसतो. नशीबाइतकाच समाजही त्यांच्या बाबतीत तुसडेपणाने वागतो. त्याचे कुरुप असणे, त्याचा पाय अधू असणे हा त्याचा दोष म्हणता येणार नाही. तरीही इतरजण तो एखादी शिसारी आणणारी गोष्ट असल्याप्रमाणे त्याच्याशी वागतात.

कधीकधी वाटतं गोविंदाचार्यालाही आई असेल. तो लहान असताना तिला आपले मुल कसेही असले तरी त्याच्याबद्दल प्रेमच वाटत असेल. कदाचित त्याला बहिणही असेल. तिलाही आपल्या भावाची माया असेल. जीएंनी यापैकी कुणाचाही कथेत उल्लेख केलेला नाही. गोविंदाचार्य एकटाच आहे. पण मायेला संपूर्ण पारख्या झालेल्या या माणसाची मायेची पाखर मिळविण्यासाठी केलेली धडपड आपल्या काळजाची घालमेल करते. जीएंच्या या कथा वाचताना धाप यासाठी लागते की ही माणसे या धडपडीत हमखास हरताना दिसतात. तरीही पुन्हा प्रयत्न करीत राहतात, अपयशी होत राहतात.

गोविंदाचार्याने मात्र आपलं नशीब स्वीकारलं आहे. हा स्वीकारही अटळ नियतीच्या स्वीकारासारखाच आहे. त्याच्या मनात कुणाबद्दलही दंश नाही. कडवटपणा नाही. नियतीचा स्वीकार करून गोविंदाचार्य शांत झाला आहे का? तसेही दिसत नाही. आपल्या आयुष्यात काहीही वेगळे घडणार नाही. जे घडले आहे ते आपल्या नशीबाचे देणे होते. त्यावर कुठलाही उपाय नाही. याहून वेगळे असे काही घडवण्याचे बळ आपल्यात नाही. जे आहे ते स्वीकारल्यावाचून गत्यंतर नाही. अशी सर्व बाजूंनी नशीबाने केलेली कोंडी लक्षात आल्यावर एक तऱ्हेचे जे उदासवाणेपण येते त्या भावनेने गोविंदाचार्याचे आयुष्य आता व्यापलेले आहे.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *