जीए कथांचा मानसशास्त्रीय मागोवा -१

मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून हा विषय मनात आला आणि त्यासोबत स्वतःच्या मर्यादांची जाणीवही झाली. मानसशास्त्राचा आवाका जितका प्रचंड आहे तितक्याच जीएंच्या कथांमधील शक्यताही अगणित आहेत. त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही गुंतागुंतीची आहे. जीएंच्या कथांमधील एरवी सामान्य वाटणारी माणसे काहीतरी असामान्य असे करून जातात आणि आपण अवाक होतो. अनेकदा ही माणसे अपयशी ठरतात. पण हे अपयश आपल्या आवाक्याबाहेरील गोष्टी पेलताना आलेले अपयश असते. त्यामुळे त्यांचे अपयशदेखील मोठेच वाटते. जीएंच्या कथेतील प्रमुख व्यक्तीरेखाच नव्हे तर इतर आजूबाजूच्या व्यक्तीरेखादेखील अनेकपदरी असतात. त्यांच्या वागण्यामागेही काहीतरी तर्क असतो. त्यांचेही स्वतःचे असे एक “लॉजिक” असते. याबाबते उदाहरण द्यायचे झाले तर पिंगळावेळ कथासंग्रहातील “तळपट” या कथेचे देता येईल.

दुसऱ्याचा नाग चोरल्याने बहिष्कृत झालेला दानय्या वस्ती सोडण्याआधी नाग आणून दाखवीनच, दिमाखाने मिरवीन या इर्ष्येने पेटलेला आहे. आयुष्यभर भयंकर नाग अंगावर वागवलेल्या आणि त्या गोष्टीचा डौल मिरवणाऱ्या दानय्याची इर्षा जितकी आपल्याला पटते तितकीच नागाला घबरणाऱ्या चंदरची कैफियतही समजून येते. त्या पोरात नाग खेळवण्याचे काळीज नाहीच. प्रत्यक्ष आयुष्यातही आपल्याला हे घडताना दिसून येते. दानय्या त्याची तिरस्काराने वारंवार हेटाळणी करतो. पण चंदरने गवतकाम स्वीकारले आहे. गवत “चावत” नाही. काम करावे आणि बिनघोर झोपावे असे त्याचे आयुष्य कायम अंगावर नाग खेळवलेल्या दानय्याला जरी नामर्दाचे वाटले तरी ते चुकीचे आहे असे आपण कसे म्हणणार? तीच गोष्ट सुडाने पेटलेल्या रुक्मीची. चारचौघात दानय्याने हसे केल्यामुळे ती संतापून दानय्याची वस्ती जाळून टाकते. अशी टोकाची भूमिका घेणारी माणसेही आपल्याला एरवी दिसत असतातच. त्यामुळे जीएंच्या कथांचा जर मानसशास्त्रीय मागोवा घ्यायचा असेल तर त्यातील कथेच्या बांधणीबरोबरच सर्व व्यक्तीरेखांचाही विचार करावा लागेल असे मला वाटते. हा विचार करताना मानसशास्त्रातील काही ठळक सिद्धांतांना मार्गदर्शक म्हणून समोर धरता येईल अशी माझी समजूत आहे.

यापैकी सर्वप्रथम विचार करावा लागेल तो व्यक्तीमत्वाशी संबंधित असलेल्या मानसशास्त्राचा, म्हणजेच पर्सनॅलिटी सायकॉलॉजीचा. प्रत्येक माणसाचे एक विशिष्ट व्यक्तीमत्व असते. या व्यक्तीमत्वाचा विशेष हा की प्रदीर्घकाळ या व्यक्तीमत्वाची जी लक्षणं किंवा त्यांचा जो स्वभाव असतो तो थोड्याफार फरकाने स्थिर राहतो. त्यात बदल घडत नाहीत. काही माणसे आयुष्यातील धक्कादायक प्रसंगांमुळे काही काळ बदलल्यासारखी वाटतात. पण कालांतराने पुन्हा आपल्या मूळ स्वभावाकडे जातात. व्यक्तीमत्वातील स्वभावदोषांवर काम करणं हा मानसोपचारांमधील एक अवघड भाग मानला जातो. त्यासाठी दीर्घकाळ चिकाटीने काम करणं आवश्यक असतं. यात मानसोपचार करणाऱ्याची आणि ते करवून घेणाऱ्याचीदेखील कसोटी लागलेली असते. व्यसनासारख्या आजारांमध्ये काही स्वभावदोष कारणीभूत असतील तर व्यसनमुक्तीसाठी त्या स्वभावदोषांवर काम करावं लगतं. जीएंच्या अनेक कथांमध्ये अशी विशिष्ट व्यक्तीमत्व असलेली माणसे दिसतात.

उदाहरण द्यायचं झालं तर “पडदा” कथेतील प्रिंसिपल ठकारांचं देता येईल. उच्चशिक्षित आणि अत्यंत रसिक असलेल्या या माणसाला सोबत लाभते ती त्यांच्यादृष्टीने अतिशय सामान्य असलेल्या पत्नीची आणि मुलाची. त्यामुळे ते आयुष्यभर एखादा डाग अंगावर असल्याप्रमाणे या कथेत वावरतात. त्यांना त्या साऱ्यांची खंत वाटत राहते. अशी विजोड व्यक्तीमत्वे जीएंच्या कथांमध्ये अनेकदा दिसून येतात. त्यात कुणीही फारसे बदलण्याचा प्रयत्न करीत नाहीत. आणि दीर्घकाळ त्यांना एकमेकांसोबत राहावे लागते. जीएंची नियती डोकावते ती येथेच. एकमेकांमध्ये कसल्याही आवडीनिवडींचे साम्य नसणारी माणसे एकत्र येतात आणि एकमेकांचा कोंडमारा करीत जगत राहतात. त्यातील खचलेपणाबद्दल वाचताना वाचकालाच श्वास कोंडल्यासारखे होते आणि दम लागतो. मात्र मानसशास्त्रानूसारदेखील ही व्यक्तीमत्वे बदलणं सोप नसतंच. त्यामुळे ही माणसे एकत्र आल्यावर क्लेशदायक जगणं ही गोष्ट जणू अपरिहार्य होऊन बसते.

मानसशास्त्रातील इतर घटकांचा जीए कथांच्या संदर्भात अशा तऱ्हेने विचार करता येईल असे मला नम्रपणे वाटते. त्यासाठी हा छोटेखानी लेख म्हणजे त्यादृष्टीने केलेली एक सुरुवात आहे.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *