कवठे (पिंगळावेळ) – जी.ए. पुण्यस्मरण

कवठे ही पिंगळावेळ कथासंग्रहातील कथा मला जीएंच्या अनेक कथांपेक्षा वेगळी वाटते. त्यातील माणसे ही नियतीने दिलेल्या दुःखाच्या भाराखाली वाकलेली नाहीत. सर्वसाधारणपणे जीएंच्या कथांमध्ये माणसे नुसत्याच दुःखात होरपळत नसतात तर ती होरपळ कधीही संपणारी नसते. किंबहूना ती त्या माणसांसोबतच संपणार असते. याचा अर्थ कवठेमधील पात्रांना दुःख नाही असे नाही. कथेचा नायक दामू हा तर खुळा दामू म्हणूनच ओळखला जातो. दूरच्या नातेवाईकाचा मुलगा म्हणून आणून ठेवलेल्या दामूबद्दल त्या घरातील माणसांना कसलेही प्रेम नाही. त्याला सापाची भयंकर भीती वाटते. म्हणजे ज्याला मानसशास्त्रात फोबिया म्हणावी अशी भीती. इतकी की सापाची भीती दाखवून लहान मुलांनीही त्याच्याकडून कुठलेही काम करून घ्यावे.

कथेतील दुसरे पात्र म्हणजे कमळी. जीएंचे या कथेतील शब्द वापरायचे म्हणजे मळक्या पंचावर मोर दिसावा तसे तिचे अस्तित्व आहे. ती तरुण आणि देखणी आहेच पण तिला त्या तारुण्याची आणि देखणेपणाची जाणीव आहे. तिला जगातील चांगल्यावाईटाचे भान आहे. तिचा स्वतःचा एक जीवनमार्ग आहे. जो लौकिकार्थाने वेगळा आहे. एके ठिकाणी ती म्हणते “उन अंगावर पडावंसं वाटलं त्यावेळी सरळ उन्हात जाऊन उभी राहिले”. कंत्राटदाराच्या वशील्याने तिला देवळात झाडलोट करण्याचे काम मिळाले आहे. तिच्या घरी कोण आहे, ती कुठे राहते, इतर वेळी काय करते याचा तपशील कथेत नाही. मात्रतिच्या आखूड होणाऱ्या कपड्यांकडे पाहून ती उठवळ आहे असा मात्र अंदाज बांधता येत नाही. स्वतःच्या अटींवर हवं ते मिळवणारी ती एक रोखठोक स्त्री आहे.

कथेतील या दोन्ही पात्रांना घरदार, कुटुंब, संपत्ती या मापाने मोजलं तर सुखी म्हणता येणार नाही. पण तरीही ते दुःखी नाहीत. दामू कुठलीही गोष्ट मनावर घेत नाही. घरात तुळसाकाकू त्याच्या नावाने कितीही ओरडली तरी हा आडदांड वाढलेला दामू त्याच्या सोबत घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवतच दिवस घालवतो. मग अगदी हॉटेलातील चविष्ट उप्पीटाची चव असो. ती त्याला आठवते. त्यामुळे उदास राहणे हे त्याच्या स्वभावत बसत नाही. कमळीने लहानपणापासून जग कसे आहे ते पाहिलेले आहे. ती जगाचे टक्केटोणपे खात वाढलेली आहे. जगातल्या बऱ्या वाईटाचे तिला भान आहे. पेरवाच्या बागेत दामू सोबत कवठे काढायला गेल्यावर ज्या तऱ्हेने ती म्हाताऱ्या रखवालदाराशी कचाकचा भांडते त्यावरुन तिच्यावर कुरघोडी करु पाहणाऱ्याला किंवा तिच्याशी उगाच लघटपणा करणाऱ्याला ती पळता भुई थोडी करत असणार याचा अंदाज येतो.

दामूला मात्र आपल्याला कुणीच नाही याची कधीतरी खंत वाटते. माणसांच्या प्रेमाला पारखा झालेला दामू माणसांच्या सहवासाच्या ओढीनेच न सांगताच त्यांची कामं करतो आणि त्यामुळे इतरांना तो हवाहवासाही वाटतो. तरीही त्याला बांधून ठेवणारे, आपले, जिव्हाळ्याचे असे कुणीही नाही. त्यामुळे कामं संपली की त्याच्या मनाच्या तळाशी असलेली “आपले कुणीही नाही” ही खंत वर उसळून येते. या टप्प्यावर त्याच्यात आणि कमळीत एक नाते निर्माण होते. येथेही जीएंच्या कथेत अपवादाने दिसणारा शृंगार जीए सूचकतेने रंगवतात. यात कमळी एक अनुभवी स्त्री आणि दामू तिच्याबद्दल आकर्षण वाटणारा पण नवखा तरुण आहे. तारुण्यसुलभ भावनांचं काय करावं त्याला कळत नाही पण कमळी त्याला मार्ग दाखवते. कवठे काढायच्या निमित्ताने पेरवाच्या बागेत एकांत मिळवण्याची कल्पना कमळीचीच. अगदी सुरुवातीपासून तिला तेथे काय घडणार आहे हे माहित आहे. कारण तिलाच ते घडवायचं आहे.

त्यानंतरही कमळीच्या व्यक्तीमत्वाचे वेगळे कंगोरे जीए दाखवतात. दामूला जवळीक हवी आहे. पण कमळीला कसलीही बांधिलकी नको आहे. दामूला तिच्या बरोबर येण्याची परवानगी ती फक्त एकच दिवस देते. दामूही स्त्रीच्या सहवासाने जणू एकदम समजूतदार झाला आहे. तो ही उगाच आग्रह करीत नाही. कारण त्या दोन्ही एकाकी जीवांनी सुखाचा मार्ग शोधलेला आहे. कथेच्या शेवटाला कमळीचं एक सुरेख वाक्य आहे. “बाग छान नव्हती, आम्ही छान होतो.” आता त्यांचे सुख हे बाहेरील गोष्टींवर अवलंबून राहाणार नाही. ते जेथे राहतील तोच महाल, ते जेथे बसतील तीच बाग. हा विचार घेऊन जगताना हे दोन जीव जीएंच्या इतर कथांमधील पात्रांप्रमाणे नियतीच्या फेऱ्यात अडकून दुःख भोगण्याची शक्यता कमीच. म्हणून ही कथा मला जीएंच्या इतर कथांपेक्षा वेगळी वाटते.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *