जीएंच्या कथांमधील (अ)सामान्य माणसे – १

जीएंच्या अनेक कथांमध्ये सर्वसामान्य माणसांचे आयुष्य रंगवलेले आहे. प्रवासी, इस्किलारसारख्या कथा अपवाद म्हणाव्या लागतील ज्यामध्ये वेगळा पीळ असणारी माणसेच जास्त भेटतात. तरी त्यातही रत्नाच्या बदल्यात स्वतःची सुटका करून घेण्यासाठी धडपडणारे आणि बळी कुणाचा द्यायचा म्हणून एकमेकांचे वाभाडे काढणारे कुटुंब आहेच. तरीही जीएंच्या कथांमध्ये सामान्य म्हणून भेटणारी माणसे ही काही बाबतीत असामान्य असतात असे मला नेहेमी वाटते. या टप्प्यावर एक बाब नमूद करून पुढे जावेसे वाटते. सामान्य कुणाला म्हणावे? त्याची व्याख्या काय? असे कुणी विचारल्यास ढोबळमानाने काही एक तत्व घेऊन जगणारी आणि ती पाळण्यासाठी धडपडणारी माणसे ही मी असामान्य या विभागात गणलेली आहेत. यातील बहुतेकांना अपयशच येते. मात्र तरीही ही माणसे शेवटपर्यंत धडपडतात. काहीजण अपयश आले तर टोकाला जाऊन ती माणसे जीव देतात. पण त्यांची धडपड हा जीएंच्या बहुतांश कथेचा प्राण असतो अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. या व्यतिरिक्त इतरांना मी सामान्य विभागात गणले आहे. अशा तऱ्हेच्या वर्गिकरणाबाबत वादविवादाला जागा असते हे येथे मान्य करूनच मला पुढे जायचे आहे.

हा मुद्दा जास्त स्पष्ट व्हावा म्हणून मला इस्किलार कथेमधील गारुड्याचे उदाहरण द्यावेसे वाटते. हा माणुस सामान्य आहे का? स्वतःही ज्या खेळासाठी थाळीत आपण कवडीही फेकणार नाही असे जो मान्य करतो असा खेळ करून हा माणुस पोटाची खळगी भरत असतो. हा खेळ सुरु असतानाच त्याचे आणि त्याच्या बायकोचे लोकांच्या रंजनासाठी लुटुपुटुचे वाद चालतात. हा गारुडी, गारुडी असूनही विषारी सापांना भिणारा आहे. त्याची बायको त्याच्यापेक्षा जास्त धाडसी आहे असे तो स्वतःच मान्य करतो. आला दिवस आनंदाने साजरा करणारा, मिळाले आहे त्यात समाधान मानणारा, आपली कुवत ओळखणारा, आहे त्यापेक्षा जास्तीची कसलिही अपेक्षा न करणारा असा हा माणुस म्हटले तर अगदी सामान्य आहे. पण मला तो सामान्य वाटत नाही. याची येथे कारणे दिली पाहिजेत.

याचे एक महत्वाचे कारण म्हणजे या माणसाला आपल्या मर्यादांची स्पष्ट जाणीव आहे. हा मला फार मोठा आणि दुर्मिळ गुण वाटतो. हा कुठल्याही आदर्श तत्वज्ञानाच्या आवरणात स्वतःचे खुजेपण लपवत नाही. त्याला आपण सामान्य आहोत हे माहित आहे आणि आपला भाऊ असामान्य होता याचीही जाणीव आहे. सामान्य काय, असामान्य काय, आपल्या मर्यादा काय आहेत, आपल्याला काय झेपेल याची काटेकोर जाणीव असलेल्या माणसाला सामान्य म्हणता येईल का हाच खरा प्रश्न आहे. जीएंच्या कथांमध्ये अशी अनेक माणसे सापडतात. या गारुड्याचे स्वतःचे असे एक तत्वज्ञान आहे. त्याप्रमाणे तो वागतो. त्याला सुख हवे आहे, आनंद हवा आहे, समाधान हवे आहे. त्यासाठी भीमपराक्रम करण्याची त्याची इच्छा नाही आणि त्याला त्याची गरजही वाटत नाही. दररोज पोटाची खळगी भरली, काळजी घ्यायला बायको असली की त्याच्या गरजा संपतात. आपल्या मर्यादांचे भान ठेवून जगणारी माणसे सामान्य असतात असे मला वाटत नाही. जीएंच्या कथांमधील अशा काही माणसांबद्दल विचार करण्यासाठी हा लेखनप्रपंच करावासा वाटतो.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *