नाग आणि जीए

आज नागपंचमीचा दिवस आणि मला आठवते आहे ती जीएंची “तळपट” नावाची गोष्ट. याक्षणी तो कथासंग्रह किंवा ती कथा माझ्या समोर नाही. पण जीएंनी सुनिताबाईंना लिहिलेल्या पत्रात सर्प, नाग, अशासारख्या गोष्टींविषयी आपल्याला एक तर्‍हेचे आकर्षण वाटते असा उल्लेख केल्याचे मला आठवते आहे. मात्र याचा अर्थ त्यांना त्यांची जवळीक नको होती. अशा गोष्टी आणि आपण यात पुरेसे अंतर राखणे हे जीवनविषयक आपले महत्त्वाचे सूत्र आहे अशासारखा प्रसन्न विनोदही त्यांनी केल्याचे आठवते. मात्र जीएंच्या कथांमध्ये नाग ही प्रमुख व्यक्तीरेखा असलेल्याही कथा आहेत आणि इतर कथांमध्ये नागांचे उल्लेखही आहेत. शिवाय जीएंच्या उपमांमध्ये तर अनेकदा सर्प, नाग आपल्याला भेटत राहतात. सांजशकूनमधील नागांच्या वसाहतीतील एक नाग इतरांपेक्षा स्वतःला वेगळा आणि भाग्यवान समजतो कारण इतर नागांनी ज्या स्त्रीला फक्त पाहायला मिळावं यासाठी आपलं सारं आयुष्य घालवलं त्या स्त्रीला या नागाने नुसतं पाहिलंच नाही तर तिला दंशही केला. जीएंची ही एकमेव कथा अशी आहे की ज्यात फक्त नाग हाच नायक आहे. आणि दुसरी कथा “तळपट”. त्यातला नायक दानय्या असला तरी या कथेच्या पार्श्वभूमीवर एक नाग सतत फणा काढून उभा असतो असे मला नेहेमी वाटते.

बाकी जीएंच्या अनेक कथांमध्ये नाग आपल्याला भेटतच असतात. भय, विस्मय, अद्भूतता, क्वचित घृणा, संशय, अशा अनेक भावनांचे अवगुंठण घेऊन नाग आपल्याला जीएंच्या कथेत भेटतो. “ऑर्फियस” कथेतील ऑर्फीयस जेव्हा आपली प्रेयसी युरीडीसी मृत्यु पावते तेव्हा तिला आणण्यासाठी देवाकडे येतो. त्याला वाटेत भेटलेल्या प्राण्याचे शरीर सर्पाचे असते. एका कथेतील स्त्री सर्पाला स्पर्श करते तेवढेच अंग सोन्याचे होऊन तिला ते धन मिळते. रमलखुणामध्ये तर रत्न चोरायला आलेला प्रवासी जेव्हा मुर्तीवर प्रहार करतो तेव्हा भंगलेल्या मूर्तीतून सर्प बाहेर येतो. एका कथेत आयुष्याच्या शेवटी देऊळ पाहायला निघालेल्या कथा नायकाला एकजण असा भेटतो ज्याला मोगरा उरडल्यासारखा गंध येणारा सर्प शोधायचा असतो. इस्किलार कथेतही गारुडी आणि त्याचा खेळ आहेच. “सेरेपी, इस्कहार, एली” या तीन शब्दांच्या पार्श्वभूमीवर सामान्य माणसे आपले आयुष्य कसे काढतात त्यावरही गारुड्याच्या निमित्ताने जीएंनी भाष्य केले आहेच. एका कथेत तर स्त्रीला पाहिल्यावर “त्याच्यात सापाप्रमाणे काहीतरी जागे झाले” असा उल्लेख करून जीए सूचकपणे त्या व्यक्तीची वासना दाखवतात.

जीएंच्या कथेतील नागाचे उल्लेख हे अनेकदा संशयी भावनेशीही संबंधित असतात. एखादा गुंता सुटत नसताना अचानक काहीतरी भयंकर विचार मनात आल्यास फांदीवरून सळसळत सर्प खाली उतरावा अशासारखा उल्लेख जीए करतात. जीएंच्या कथेचा आकृतीबंध हा घट्ट असल्याने त्यांच्या कथांमधील नाग, सर्पांचे उल्लेख कधीही आणि कुठेही अस्थानी असे वाटतच नाहीत. त्या संदर्भात काही ठिकाणी ते सहजपणे लिहून गेले असले तरी त्यात फार मोठा अर्थ दडलेला असतो. उदाहरण सांगायचे झाले तर प्रवासी कथेतील गारुड्याच्या बायकोने पकडलेला विषारी साप. तो बाहेर पडल्याबरोबर गारुड्याच्या चेहर्‍यावर भीती दिसु लागते. कारण त्याला झेपणारा तो साप नसतो. त्याला तो जवळदेखिल नको असतो. सर्वसामान्य आयुष्य घालवणार्‍या माणसांची तितकीच सामान्य सुखदु:ख, अपेक्षा, आणि आपली सामान्य पायरी, कुवत ओळखून किंवा ठरवून त्याप्रकारेच आयुष्य घालवण्याची इच्छा या सार्‍यावर एका विषारी सापाच्या निमिताने जीए भाष्य करून जातात.

बाकी “तळपट” कथेची गोष्टच वेगळी. त्यातला नाग हा दानय्याच्या इर्ष्येचा भाग आहे. हातून नागाची चोरी झालेला गारुडी वस्तीत राहु शकत नाही. ते पापकर्म आहे. पण म्हातार्‍या झालेल्या दानय्याला वस्ती सोडून जाताना अपमानित होऊन जायचं नाहीये. जातिवंत नाग पकडून दाखवण्याची त्याची इच्छा आहे. आपल्या पैकी सर्वच माणसे “प्रवासी” कथेतील गारुड्यासारखी नसतात. काहीजण “तळपट” कथेतील दानय्यासारखीदेखिल असतात. या माणसांना जातीवंत नाग पकडण्याची इच्छा असते. त्यासाठी जीवाचे रान करायला ही माणसे तयार असतात. यश मिळालं तर ठिकच पण यांचं अपयशही यशाइतकंच भव्य असतं कारण त्यांनी अप्राप्य गोष्टीसाठी झुंजण्याचा पराक्रम केलेला असतो. स्वतः जीएंना या गोष्टीचे आकर्षण होते अशी माझी समजूत आहे. कारण सांजशकूनमधला वृद्ध सर्प जो नायक असतो, आपले स्वप्न भंग झालेले पाहून स्वतःला हताशपणे दरीत लोटून देतो. अप्राप्य स्वप्नांची ओढ आणि त्यासाठी अनेकदा अयशस्वीपणे झुंज देणारी माणसे हे जीएंच्या कथेतील कधीही न संपणारे गारुड आहे.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *