स्वामी – जी.ए. कथा एक आकलन – भाग – ३

स्वामी कथेचा नायक गावाबाहेर पडतो. आता तेथे त्याचे कुणीही राहिलेले नाही. पण त्याला बाहेर पडायला उशीर होतो. पायाखालची वाट ही अनोळखी असते. त्यामुळे खळग्यात पाय पडून तो पायही दुखावून घेतो. तशातच त्याला कोपऱ्यावर बस दिसते तो पाय दुखत असतानाच बस पकडायला धावतो पण ती न थांबताच निघून जाते. पुढे त्याच्या मनातील वाक्य आहे “कुणी उतरणारा असता तर बस एक दोन मिनिटे थांबली असती पण आज मी जाणार होतो मग कशाला कोण उतरेल?” जीए असे वाक्य जेव्हा लिहून जातात तेव्हा जीएंच्या कथेतील साध्या साध्या गोष्टीतही अपयश मिळालेला नायक पुन्हा एकदा येथे साकार होताना दिसतो. साधी बस ती काय पण ते देखील या नायकाला लाभत नाही.

आणि हे त्याचे दुर्दैव इथेच संपत नाही. गाव अनोळखी झालेला, वाट अनोळखी आणि दुसरी बस सकाळपर्यंत नाही. अशावेळी पुन्हा गावात जावे तर तेथे जाणार तरी कुणाकडे? शिवाय आता अंधार पडत आलेला. झाडाखालीच अंग पसरण्याचीही सोय नाही. नायकाला सर्वच बाजूंनी दुर्दैवाने जणू घेरून टाकले आहे. जीएंचे रुपक येथे दिसून येते अशी माझी समजूत आहे. काहींच्या आयुष्यात असे क्षण आलेले असतात. त्यांना एखाद्या गोष्टीचे अनावर आकर्षण वाटते. ते आपले सुरक्षित आयुष्य सोडून त्या क्षणाच्या ओढीने स्वतःला वेगळ्याच दुनियेत झोकून देतात. मात्र काही काळाने धूंदी उतरत जाते आणि लक्षात येते की आता उशीर झालेला आहे. त्यानंतर ते जेव्हा परतण्याचा विचार करतात तेव्हा पुर्वायुष्याकडे नेणारी बस डोळ्यासमोरच निघून गेलेली असते.

अशावेळी जेव्हा माणुस जेव्हा पुन्हा परतण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की परतण्याचे सर्व मार्गच आता खुंटले आहेत. प्रत्यक्ष आयुष्यात परतण्याचे मार्ग बंद होण्याची वेगळी कारणे असतील. येथे मात्र बस दुसऱ्या दिवशी सकाळी आहे. अंधार पडू लागला आहे. रात्र घालवण्याची कुठेही सोय नाही आणि अगदी मागल्या गावात परतावे तर तेथेही ओळखीचे कुणी नाही अशी परिस्थिती आहे. जीएंच्या कथेची बांधणी मला या अर्थाने अगदी चिरेबंद असते असे वाटते. कुठेही बोट शिरायला वाव नाही. अशावेळी माझ्या मनात इतर विचार येतात. समजा हा नायक येथे उतरला नसता तर? समजा त्याला गावात कुणी ओळखीचे भेटले असते तर? किंवा त्याला ही बस मिळाली असती तर?

पण जीएंच्या कथेत हे होणार नसते कारण त्यांच्याकथेतली माणसे ही सामान्य असूनही सामान्य नसतात. ती धडपड करणारी असतात. आणि म्हणूनच त्यांच्या पदरी आलेले अपयश आपल्यालाही विषण्ण करते. कथानायक आता काय करावे या विचारात आहे आणि त्याला तेथे अचानक महंत भेटला आहे. कथेत महंताची योजना अतिशय विचारपूर्वक झालेली आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर जेव्हा परतीचे मार्ग खुंटलेले असतात तेव्हा माणुस आत्मपरिक्षण करु लागतो का? जर तसे असेल तर येथे महंत त्यासाठीच आला आहे असे मला वाटते. मागे जाता येत नाही. परतीचे मार्ग बंद झालेले आहेत. पुढेही जाणे कठीण झाले आहे. अशावेळी माणसे अध्यात्माची कास धरत असतील तर मग त्यांना एखादा मार्ग मिळून जातो. स्वामी कथेतील नायकालाही एक मार्ग या महंताच्या रुपाने मिळाला आहे. त्याच्या सोबत आता त्याचा पुढचा प्रवास घडणार आहे…

अतुल ठाकुर