सांजशकुन

सध्या जीएंच्या “सांजशकुन” चे वाचन सुरु आहे. असंख्यवेळा हे पुस्तक वाचले तरी मला ते संपूर्ण कळेल याची खात्री वाटत नाही. पण मी ते वाचत असतो याचे कारण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याचा मला वेगवेगळा अर्थ लागतो असे वाटते. त्यामुळे यापुढेही या पुस्तकाचे वाचन सुरु राहिलच. जीएंच्या इतर कथासंग्रहांपेक्षा हा कथासंग्रह वेगळा आहे. जीएंच्या इतर कथांपेक्षा यातील काही कथा तुलनेने छोट्या आहेत. यातील कथांमधल्या बहुतेक माणसांना नावे नाहीत. जीए ती माणसे कोण आहेत इतकंच सांगतात. जीएंना ते पुरेसं वाटतं कारण या कथांमध्ये त्या नावांची गरजच नाही. म्हणून मग त्या कथांमध्ये बैरागी असतो, प्रवासी असतात, साधक असतात, वाटसरु असतात, व्याध असतो. काहीवेळा नुसता समुद्रच असतो. योद्धे असतात. थोडक्यात सांगायचं तर काही विशिष्ट प्रवृत्ती ठळकपणे दाखवणारी माणसे येथे आढळतात. मात्र इतर कुठलीही माहिती जीए देत नाहीत. कथांमध्ये येणार्‍या प्रदेशांच्या वर्णनामध्ये हा वेगळेपणा आहेच. 

बहुतेक कथांमधले प्रदेश हे वेगळ्या वाटेवरचे आहेत. सामान्यपणे माणसे जी वाट चोखाळत नाहीत तेथले आहेत. मग ते दुर्गम भागातील भग्न मंदिर असेल. एखादे आडवाटेवरचे गाव असेल. गुहा असेल. या कथांमधील मार्ग बहुधा एकाकीच आहेत. काहीवेळा सोबत असते पण अंतिम प्रवास हा एकट्यानेच घडणार असतो. जेथे घटना घडतात त्या वास्तूही नेहेमीच्या नाहीत. मंदिर तर आहेच पण ते फार प्राचीन, मनोरा आहे, दीपस्तंभ आहे.अगदी साधी पण एकाकी झोपडीदेखिल आहे. या सार्‍या कथांमधील निर्जन एकाकीपणाला विराट पार्श्वभूमी आहे ती अथांग सागराची, घनदाट अरण्याची, जीएंच्या भाषेत सांगायचे तर हाताने गोळा करता येण्यासारख्या दाट अंधाराची. कथानायकाव्यतीरिक्त इतर माणसे या कथांमध्ये जेव्हा येतात तेव्हा ती माणसे हे वेगळे वातावरण जास्त गडद आणि अधोरेखित करत जातात. आणि नेहेमीप्रमाणेच जीएंच्या या कथांमध्येदेखील सामना हा माणसामाणसांमधला नसून माणूस आणि नियतीमधला आहे.

मग एखाद्या बैराग्याला आपण नियतीच्या हातातले बाहुले आहोत का असा प्रश्न पडतो आणि तो निसर्गाचा रौद्रभीषण चमत्कार काहीक्षणापुरता का होईना बदलण्याचा प्रयत्न करतो. कुणीतरी आपले अश्रू आणि रक्त यांचे शिंपण करून प्रेमाचे, मैत्रीचे रोप लावण्याची धडपड करतो. कुणी प्रवासी वासनांचे अत्त्युच्च टोक गाठून त्यातून मुक्त व्हायला पाहतात. तर कुणी आयुष्याने घातलेली निरनिराळी कोडी सोडवत मुक्तीच्या प्रवासाकडे वाटचाल करु पाहतात. सार्‍या कथांमधले एक महत्वाचा समान बिंदू म्हणजे कुंपणापलिकडे काय आहे ते पाहण्याची घडपड कथांमधील ही माणसे करीत असतात. येथे ऐहीक जीवनातील समस्या नाहीत. आपल्याकडे काही परंपरांमध्ये ऐहीक आयुष्यातील सारे भोग आणि वासना पुर्ण झाल्यावर अध्यात्माचा प्रवास सुरु होतो. काहीसा त्या तर्‍हेचा या कथा नायकांचा प्रवास आहे. काही कथांमध्ये तर नायक मानव नाही. समुद्र आहे, गोरीला आहे, सर्प आहे. किंवा काही ठिकाणी नुसत्या प्रसंगांचे वर्णन आहे.

असे म्हणतात की ब्रह्म पाहिलेला माणूस ते कसे आहे सांगायला परत येत नाही. तो त्यातच विलिन होऊन जातो. या कथांमधली माणसे जेव्हा या जगावेगळ्या प्रवासाला निघाली आहेत ती परत न येण्यासाठीच. त्यांना ऐहीकाची ओढ नाही. ती सारी बंधने निश्चयाने बाजूला सारुन, मायेचा पसारा बाजूला करून त्यांचा प्रवास सुरु झाला आहे. हा प्रवास कुठल्या वाटेने होणार आहे? त्याची दिशा काय आहे? या प्रवाशांचे ध्येय काय आहे? ते त्यांना लाभते की नाही याबद्दल सुस्पष्ट उत्तर सर्वच कथांमध्ये मिळत नाही.आणि मिळालेले उत्तर स्पष्ट वाटले तरी त्यात काहीतरी उणे राहून गेलेले आहे हेही वाचकाला जाणवावे अशी किमया जीएंनी या कथांमध्ये केली आहे. कथा या तपशीलाने भिन्न असल्या तरी नियतीशी मनस्वी मानवाने घेतलेली झुंज हा धागा जीएंनी या कथांमधून एकसारखा गुंफला आहे. सांजशकुन मधल्या या कथा वाचताना दम लागतो. या कथांबद्दल लिहिणे माझ्यासारख्याला पेलवणारे नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीही एक (अयशस्वी का होईना पण) प्रयत्न करावासा वाटतो. त्याची सुरुवात या कथा संग्रहातील “अस्तिस्तोत्र” या कथेने करायची आहे.

अतुल ठाकुर