तळपट – जी ए – नागपंचमीच्या निमित्ताने

जीएंना नागाबद्दल एक आकर्षण होतं हे जीएंच्या वाचकांना माहित असेलच. सुनिताबाईंना लिहिलेल्या पत्रात तसा स्पष्ट उल्लेख ते करतात. त्यांच्या अनेक कथांमध्ये निरनिराळ्या निमित्ताने नागाचे उल्लेख आहेत. मला तर नागपंचमी आली की नागासोबतच जीएंची आठवण होते आणि त्यासोबतच आठवते ती मनावर विलक्षण गारुड करणारी जीएंची “तळपट” ही कथा. या कथेचा बाज देखिल जीएंच्या इतर कथांप्रमाणेच आहे. यातही सर्वसामान्यांनी नियतीशी घेतलेली झुंज आहे. जीए वाचकाला आपले आकलन पुन्हा पुन्हा तपासायला लावतात असा माझा अनुभव आहे. त्यामुळे या टप्प्यावर खरंच जीएंच्या कथांमधील माणसे सामान्य असतात का या प्रश्नाचा मला पुन्हा मुळापासून विचार करावासा वाटतो. तळपट कथेतील दानय्या आधी एका स्त्रीने केलेल्या सर्वनाशाचा बदला घेण्यासाठी पोटात आग घेऊन हिंडतो. त्यानंतर तिचा पत्ता लागेनासा झाल्यावरही आयुष्यभर ती धग, ते विष पोटात बाळगतो. पुढे हातून गैरकृत्य घडल्याने त्याला वस्तीबाहेर काढण्यात येते तेव्हाही तो कुणीही पकडला नसेल असा दुर्मिळ नाग पकडण्याची मनिषा बाळगतो. त्याला वस्तीतून मानाने बाहेर पडायचं असतं. त्याला स्वतःच्या नाग पकडण्याच्या आणि खेळवण्याच्या कौशल्याचा विलक्षण अभिमान आहे. हा दानय्या मला आता कुठल्याही अर्थाने सर्वसामान्य वाटत नाही.

एखादी आग मनात ठेवणारी अनेक माणसे असतील पण त्यासाठी प्राणांची बाजी लावणारी माणसे सर्वसामान्य असतात असे मानणे मला कठीण वाटते. कदाचित सर्वसामान्य म्हणजे कोण या व्याख्येचा या निमित्ताने उहापोह करावा लागेल. मात्र त्यात न पडता मला जीएंच्या कथेत अनेक ठिकाणी काही विशिष्ट प्रकारची माणसे दिसतात त्यांच्याकडे बोट दाखवावेसे वाटते. तळपट कथेतच चंदर आहे. दानय्याने सांभाळलेला दूरच्या नातेवाईकाचा मुलगा. हा आपल्या जमातीचे नाग पकडण्याचे धाडसाचे, पराक्रमाचे काम सोडून आता गवतकामावर लागला आहे. त्याच्याबद्दल तर दानय्याला मूक तिरस्कारच आहे. मात्र आता त्याच्यासारख्याकडूनच दानय्यने वस्तीतून निघून जावे हे ऐकून घेण्याचे दानय्याच्या नशीबी आले आहे. नशीब फिरल्यावर क्षूद्र माणसांकडून अपमान होणे हा पराक्रमी माणसांच्या नशीबी असणारा आजच्या जगातही दिसणारा एक अटळ भोग या निमित्ताने येथेही दिसला आहे. हा चंदर मला गतानुगतिक वाटतो. आपल्या षंढत्वाचे समर्थन करणारे त्याचेही एक तत्त्वज्ञान आहे. आणि तसे अनेकांचे असते. नाग पकडण्याचे दानय्याकडून शिकताना चंदर भेदरतो आणि त्याचे शिक्षण संपते. त्याने गवतकामाचे बिनघोर आयुष्य स्वीकारले आहे. त्यात कसलाही पराक्रम किंवा धाडस नाही. पण कसला धोकाही नाही. मृत्युशी खेळून जहरी नागाला पकडण्याची मनिषा आयुष्य संपत आले असतानाही बाळगणारा दानय्या आणि नागाला घाबरून आयुष्यभर गवतकाम करण्यात सूख मानणारा चंदर यात सामान्य कोण हे आता ज्याने त्याने ठरवावे.

तळपट कथेत नेहेमीप्रमाणेच जीए अनेक तपशील देतात. ते वाचकांनी मूळातूनच वाचावे यासाठी मी कथेचा गोषवाराही सांगण्याचे टाळले आहे. मात्र या कथेच्या निमित्ताने जीएंच्या मनाच्या आणखी शोध घेण्याचा मोह मला आवरता येत नाही. ऐन निकालाच्या क्षणी आपला सर्वनाश केलेली स्त्री दानय्याला आठवते आणि त्याचे हात दुबळे होऊन जहरी नाग त्याचा हातून निसटतो. आयुष्यभर बाळगलेली धग, पोटात साठवलेले विष अशा कस लागण्याच्या क्षणी आपले हात दुबळे करेल असे दानय्याला कधीतरी वाटले असेल का? आणि येथेच मला जीएंना महाभारताविषयी वाटणारे अनावर आकर्षण लक्षात घ्यावेसे वाटते. जन्माचे रहस्य कुंतीने सांगितल्यामुळे पराक्रमातील त्वेषच निघून गेलेला कर्ण, अश्वत्थामा मेला हे कानावर पडल्याने दुबळे झालेले द्रोणाचार्य, शिखंडीवर बाण चालवता येत नसल्याने दुबळे झालेले भीष्म यांच्यामधून जीएंनी दानय्या साकारला असेल का? पराक्रमी माणसात एखादीतरी दुबळी बाजू असते आणि ती शोधून त्यावर एकतर शत्रू प्रहार करतो किंवा नियती कुठल्याना कुठल्या निमित्ताने घात करते. दानय्याच्या बाबतीत एका स्त्रीच्या स्मरणाने नियतिचे काम केले आहे. जीए तळपट कथेत कुठलाही निर्णय देत नाहीत हे या कथेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मला वाटते. हा निर्णय त्यांनी वाचकांवर सोपवला आहे.

वस्तीतून बाहेर पडून दानय्या नाग शोधायला बाहेर पडतो. कथेच्या शेवटी नाग आणि दानय्या अखेरची झूंज घेण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकतात. मात्र येथे हा जहरी नाग ही मला दानय्याची नियती वाटत नाही. नियतीने आपले दान टाकायला अगदी आधीपासून सुरुवात केली आहे. जेव्हा दानय्या आपल्या होणार्‍या बायकोचा अपमान करतो तेव्हा ही नियति आपल्याला दिसते. हा अपमान सहन न होऊन जेव्हा ती स्त्री दानय्याच्या वस्तीवर हल्ला करते तेव्हा ही नियति दिसते. दानय्याचा नाग जेव्हा चिरडून मरतो तेव्हा ही नियतीची पाऊले दानय्याच्या आयुष्यात उमटू लागतात. नागपंचमीला स्वतःचा नाग नसताना त्याला दुसर्‍याचा नाग चोरण्याची बुद्धी होते तेव्हा तर या पावलांचे स्पष्ट ठसेच दिसतात. आणि आता नाग समोर असताना त्या स्त्रीच्याच रुपाने नियती पूर्ण चित्राने दानय्यासमोर उभी ठाकते. या झुंजीत कोण जिंकते हे आता वाचकांनीच ठरवावे असे मला वाटते.

अतुल ठाकुर